वाळपई / प्रतिनिधी
गोव्यातील सध्याच्या प्रतीक मानल्या जाणाऱया व जागृत देवस्थान म्हणून विकसित होत असलेल्या सत्तरी तालुक्मयातील केरी सत्तरी येथील श्री सातेरी केळबाई आजोबा देवस्थानाचा पारंपारिक शिगमोत्सव तब्बल 21 वर्षांनंतर यावषी साजरा करण्यात येणार आहे .यामुळे गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून 21 वर्षानंतर ढोल-ताशांच्या गजरात व सुप्रसिद्ध असलेल्या सोकारती गायनाच्या माध्यमातून हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी जोरात सुरू झाली असून होळी साजरी करून या उत्सवाला प्रारंभ होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे .यामुळे हजारोंच्या संख्येने भाविक या उत्सवाचा आनंद लुटण्याच्या माध्यमातून सतत पाच दिवस या भागांमध्ये हजर राहणार असल्याचे समजते ..
याबाबतची माहिती अशी की गोव्यातील अत्यंत जागरूक समजल्या जाणाऱया आजोबा देवस्थान हे अनेक भाविकांसाठी सध्याच्या प्रतीक मानले जात आहे .नवसाला पावणारा आजोबा व अनेक संकटावर मात करण्यासाठी क्षत्रछाया देणारी सातेरी केळबाई देवी हे अनेक भाविकांसाठी श्रद्धास्थाने ठरलेली आहेत .यामुळे हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या देवस्थानाला सध्याचे प्रतीक मानणारे भाविक मंडळी गोवा महाराष्ट्र कर्नाटकामध्ये प्रचंड प्रमाणात आहेत .गेल्या 1998 सालापासून या देवस्थानाच्या महाजना दरम्यान अधिकारावरुन वाद निर्माण झालेले आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर 1998 सालापासून या देवस्थानचा पारंपारिक उत्सव बंद झालेला आहे .त्याचबरोबर गेल्या बारा वर्षांपासून देवस्थानाचे धार्मिक उपक्रम महाजनांच्या अधिकार वादाच्या पार्श्वभूमीवर बंद झाले होते.
देवस्थानांच्या धार्मिक उपक्रमांना गुढीपाडव्यापासून सुरुवात
या देवस्थानाचे एकूण पाच महाजन आहेत. यात हळीद ,गावस, गावकर राणे व माजीक यांचा समावेश आहे. या देवस्थानच्या काही महाजना दरम्यान अधिकार व मानपानावरुन निर्माण झालेले मतभेद त्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाचे धार्मिक उपक्रम तब्बल बारा वर्षे बंद होते.
या संदर्भाचा वाद न्यायालयात प्रलंबित झाला होता. मात्र गुढीपाडव्याच्या काही दिवसापूर्वी सत्तरी तालुक्मयाच्या सयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर यांनी दिलेल्या निवाडय़ानुसार देवाचे धार्मिक व पारंपरिक उपक्रम कार्यक्रम समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात यावे अशा प्रकारचा निवाड देण्यात आल्यानंतर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या देवस्थानाचे धार्मिक उपक्रमाला प्रारंभ करण्यात आलेला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या धार्मिक उपक्रमांना भाविकांनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती लावून देव दर्शनाचा लाभ घेतला होता. त्यानंतर कार्यकारी समितीच्या माध्यमातून देवस्थानांमध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव व इतर स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम व उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला होता.
पारंपरिक उत्सव साजरा करण्याची पूर्वतयारी जोरात
या देवस्थानाच्या पारंपरिक शिमगोत्सव 21 वर्षांपासून बंद झाला होता .यंदा कार्यकारी समितीच्या माध्यमातून देवस्थानाचे धार्मिक व पारंपारिक उपक्रम सुरू करण्यात आल्यानंतर शिमगोत्सव साजरा करण्याची पूर्वतयारी जोरात करण्यात आली होती. मात्र गावकर समाजाने यासंदर्भात हा उत्सव साजरा करण्यासाठी आक्षेप घेणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मात्र ही याचिका संबंधित न्यायालयात प्रंलबित असल्याचे समजते. दोन दिवसापूर्वी देवस्थानाच्या महाजनांनी पारंपरिक शिमगोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून मंगळवारपासून हा उत्सव सुरू होणार आहे .मंगळवारी पारंपारिक होळी साजरी करण्यात येणार असून 21 वर्षांनंतर या पारंपरिक उत्सवाच्या माध्यमातून ढोल-ताशांचा गजर या भागांमध्ये निदादणार आहे .यामुळे या भागांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून या उत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून आनंद घेणार असल्याचे समजते. या उत्सवात गावकर समाज भाग घेणार की नाही यासंदर्भात संदिग्धता निर्माण झाली आहे.
महोत्सवातील सतीउत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू
दरम्यान केरी येथील पारंपरिक उत्सवात साजरा होणारा सती उत्सव हा प्रत्येक भाविक व तमाम नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या ठिकाणी साजरा होणारा सती उत्सव यांच्या माध्यमातून गायल्या जाणाऱया सोकारती यांना लाभलेला विलक्षण अर्थ व सादर करण्याची पद्धत यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून योग्य प्रकारचे वातावरण निर्माण होत असते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक खास करून उपस्थित राहतात यंदा ही चांगली संधी भाविकांसाठी उपलब्ध झालेली आहे.
दरम्यान केरी येथील गावकर समाजातील प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा समाज यात भाग घेणार नाही मात्र सादर करण्यात आलेल्या आक्षेप निवेदनावर सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.