शाळा सुरु झाल्या पण एसटी बस केव्हा सुरू होणार? पालकांचा सवाल
प्रतिनिधी / दोडामार्ग:
केर, मोर्ले, भेकुर्ली भागातील विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी घोटगेवाडी या ठिकाणी येतात सध्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शाळा सुरू झाल्या. पण शाळांपर्यंत जाण्यासाठी एसटी बस सुरू झाल्या नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोरोनापूर्वी प्रशालांच्या वेळानुसार ज्या एसटी फेऱ्या सुरू होत्या. त्या पूर्ववत करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांतुन होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, दोडामार्ग तालुक्यातील बऱ्याच गावात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे एसटी अभावी शैक्षणिक नुकसान होत आहे तर केर, मोर्ले, भेकुर्ली परिसरातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणासाठी गैरसोय होत आहे. येथील विद्यार्थ्यांना चार किमी. अंतरावर घोटगेवाडी या ठिकाणी माध्यमिक विद्यालय आहे. त्याठिकाणी पोहचण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. राज्य शासनाने वर्ष दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र शाळांमध्ये विद्यार्थी पोहचणार कसे ? याबाबत नियोजन अद्याप झाले नाही. ग्रामीण भागात दळणवळणासाठी एसटी ही एकमेव सेवा आहे. त्यामुळे प्रशालांच्या वेळेत एसटी सुरू करण्याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने करावेत अशी मागणी पालक व ग्रामस्थांतुन होत आहे. सदर प्रशाला प्रशासनाची बोललो असता विद्यालयाकडून एसटी सुरू करण्यासाठी रा. प. म. ला पत्र दिल्याचे सांगण्यात आले.
लवकरात लवकर एसटी बस सुरू करा ! – सगुण नाईक ( पालक तथा माजी सरपंच केर )
पालक तथा केर चे माजी सरपंच सगुण नाईक म्हणाले, एसटी फेरी अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. काही विद्यार्थी पायपीट करत शाळेपर्यन्त जातात. पूर्वीच्या तुलनेत आताच्या विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत हे लक्षात घेऊन लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांच्या वेळेवर एसटी बस फेरी सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यात यावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.









