अवघ्या काही तासांवर बाप्पाच्या आगमनाची लागलीय सर्वांना प्रतीक्षा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणेश चतुर्थी अवघ्या दिवसावर येऊन ठेपली आहे. आपल्या लाडक्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी सारे गणेशभक्त आतूर झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यासाठी परिस्थिती सुधारल्याने लोक सुस्कारा सोडून तयारीला लागले आहेत. या तयारीसाठी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱयांमुळे रस्त्यांवरही वाहनांची प्रचंड गर्दी असल्याचे चित्र आहे.
कोकणात गणेशोत्सव हा सर्वात मोठा, लाडका आणि सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन साजरा केला जाणारा सण. या सणाचा आनंद हा अवर्णनीय असतो. गेल्यावर्षी कोरोनाच्या भीतीने सर्वांनाच ग्रासले होते. दरवर्षी कोकणातील लोक जे मुंबई व इतर ठिकाणी नोकरीधंद्यानिमित्त स्थायिक झाले होते. यंदा मात्र रेल्वेगाडय़ा सुरू असल्याने व वातावरण बऱयाच प्रमाणात निवळल्याने चाकरमान्यांना गावी येण्यास तशी अडचण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे चाकरमानी आपल्या आवडत्या उत्सवाचा गावी येऊन आनंद लुटणार आहेत. जिह्यात यावेळी सुमारे 114 सार्वजनिक व 1,66,539 खासगी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी रेल्वे, एसटी, खासगी बसेसने हजारो चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवस चाकरमान्यांचा ओघ असाच राहणार आहे. चाकरमान्यांच्या आगमनामुळे बाजारहाट व इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. घरोघरी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, आरास सजावट, गोडधोड पदार्थांची पूर्वतयारी अशी गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. तसेच गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तीकार आता गणेशमूतांवर अखेरचा हात फिरवत आहेत.
यावर्षी कोरोनामुळे आपल्या उत्साहावर पाणी पडू द्यायचे नाही, अशा निर्धाराने बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गेल्यावर्षी बहुतांशजणांनी दिड दिवसांच्या तसेच 5 दिवसांच्या गणपत्ग्नााr विसर्जनाला जास्त महत्व दिले होते. शेजाऱयांकडे, गावात, वाडीत, नातेवाईकांकडे जाणेही लोकांनी टाळले होते. मात्र यंदा ती कसूर भरून निघणार आहे. बाहेरगावी असलेले चाकरमानी आपल्या गावी यायला लागले आहेत. रेल्वेच्या जादा गाडय़ा चतुर्थीनिमित्त सोडल्या जात असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळत आहे. गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग शहरात, गावागावात जोमाने सुरू आहे. या तयारीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
उत्सव काळात गुन्हा घडल्यास तत्काळ पोलीस कारवाई
रेल्वे प्रशासन, पोलीस विभाग तसेच रेल्वे सुरक्षा बल यांच्यात समन्वय ठेवून रेल्वे मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणपती आगमन, गौरी गणपती विसर्जन व अनंत चतुदर्शी या दिवशी जिल्हय़ात ताडी-माडी, देशी-विदेशी दारू दुकाने बंद ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हय़ातील स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारावर तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूकसंदर्भातील गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी अवैध प्रवासी वाहनातून प्रवास टाळावा तसेच कोविड-19 रोगाच्या अनुषंगाने शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.









