सतत दोन दिवसांत अनेक शेतकऱयांना फटका
वाळपई / प्रतिनिधी
केरी सत्तरी येथे गव्या रेडय़ांचा हैदोस सुरूच असून काल रात्री गादोवाडा येथील रघुनाथ माजिक यांच्या शेताला असलेली काटय़ाच्या तारेचे कुंपण मोडून भेंडी लागवड व काजूच्या कलमांची नासधूस केली होती.
यामुळे या भागामध्ये शेतकरी बांधवाकडून चिंता निर्माण करीत असतानाच पुन्हा एकदा काल रात्री गव्यानी भागांमध्ये प्रवेश करून सुमारे सहा शेतकऱयांची मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याची बाब उघडकीस आलेली आहे. यामुळे सध्या रानटी जनावरांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात संघर्ष निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन रानटी जनावरांचा बंदोबस्त जंगलामध्ये करण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी तमाम शेतकरी बांधवांनी केली आहे.
मोर्ले गडाच्या पायथ्याशी असलेल्या या परिसरात गव्या रेडय़ांचा हैदोस ही नित्याची बाब झाली आहे. गवेरेडे व इतर जनावरांकडून नासाडी होऊ नये म्हणून रघुनाथ माजिक यांनी आपल्या शेताला काटेरी तारेचे 6 फूट उंच कुंपण केले होते. पण या काटेरी कुंपणाची पर्वा न करता गवेरेडय़ांच्या कळपाने हे कुंपण एका ठिकाणी जमीन दोस्त करून आत शिरले आणि ही नुकसान केली. यात रघुनाथ माजिक, गौतमी माजिक व गुरुदास माजिक यांची भेंडी शेती व काजूची कलमे तर नारायण माजिक यांची सुमारे 20 काजूच्या कलमांची नासाडी केली आहे. यामुळे त्यांना मोठी आर्थिक नुकसान झाली आहे. गव्यारेडय़ानी येथील भेंडीचे पीक खाऊन फस्त तर काजूची कलमे उन्मळून टाकली. काजूची कलमे 3-4 वर्षाची लागवडीची असल्याने त्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे.
वनखात्याचे कर्मचारी फिरलेच नाही.

दरम्यान काल या घटनेची माहिती संबंधित शेतकऱयांनी वनखात्याला देण्यासाठी केरी राऊंड फॉरेस्टर कार्यालयात गेले असता वनखात्याचे वनरक्षक अथवा अन्य कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. तद्नंतर त्यांनी चौकशी केली असता आज रविवार सुट्टी असल्याने कोण नाही असे कारण पुढे आले. पण त्यांनी केरी वन क्षेत्राचे क्षत्रिय वन अधिकारी विवेक गावकर यांच्याशी संपर्क साधला असता वन रक्षक येऊन शेतीची पाहणी करणार आणि रात्रीच्या वेळी ही त्यांची गस्त असणार. दरम्यान सोमवारी वनखात्याच्या अधिकाऱयांनी भागांमध्ये भेट देऊन एकूण नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यासंदर्भात आवश्यक स्तरावर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करणार असल्याचे स्पष्ट केले .
नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान ही झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी सदर सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱयांनी केली आहे. मोठे काबाड कष्ट करून शेती करावी आणि जंगली प्राण्यांनी त्याची अशी नासधूस करावी यामुळे शेतकरी हवालदिल बनला असून शेतकऱयांना आधार देण्यासाठी ही भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान रविवारी रात्री पुन्हा एकदा त्यांनी सदर भागांमध्ये प्रवेश करून नामदेव केरकर उत्तम गावस रामा गावस हरिश्चंद्र केरकर व रामकृष्ण माजीक यांच्या कृषी बागायतीचे मोठय़ाप्रमाणात नुकसान केल्याची बाब समोर आली आहे.
जंगली भागात पाणवठे बनवावे अशी मागणी…..
गवे पाण्यासाठी अंजुणे धरणाच्या कालव्यात येतात आणि मग खाली शेतात घुसतात. सरकारने जर जंगल भागात पाणवठे तयार केल्यास गवरेडे डोंगरावर थांबले व खाली उतरणार नाही. तेंव्हा जंगल भागात पाणवठे तयार करावे अशी मागणी शेतकरी नामदेव केरकर यांनी केली.









