बेंगळूर/प्रतिनिधी
केरळमध्ये विधानसभा निवडणुक एप्रिलमध्ये होणार आहे. जनता दल (सेक्युलर) ने विधानसभा निवडणुकीसाठी बेंगळूरमध्ये उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
माजी पंतप्रधान आणि जद (एस) चे प्रमुख एच. डी. देवगौडा यांनी या यादीला मंजुरी दिली. माजी मंत्री डॉ. नीला लोहिठदास नादर कोवळम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, माजी मंत्री आणि आमदार मॅथ्यू टी थॉमस तिरुवला येथून जेडीएसचे उमेदवार असतील, जलसंपदा मंत्री के. कृष्णकुट्टी चित्त्तूरमधून तर माजी मंत्री जोस थेटाईल अंकामालीमधून निवडणूक लढवणार आहेत, असे देवेगौडा यांचे निवेदन आहे.
जेडीएस केरळ प्रदेशाध्यक्ष मॅथ्यू टी थॉमस यांना लिहिलेल्या पत्रात गौडा यांनी, आपण पक्षाच्या चिन्हावरुन येत्या निवडणुकीसाठी लढणार्या उमेदवारांना मान्यता दिली आहे. “कृपया त्यांच्याशी संबंधित विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यास परवानगी द्या. योग्य वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी मी त्यांना आवश्यक ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म पाठवीन, असे माजी पंतप्रधानांनी एका पत्रात म्हटले आहे.
जेडी (एस) हा सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) युतीचा घटक पक्ष आहे आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी लढलेल्या पाच पैकी तीन जागा जिंकल्या होत्या.