पक्षाकडून 83 उमेदवारांची घोषणा : 33 आमदारांचे तिकीट कापले : दिग्गजांना संधी नाकारली
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळमध्ये सत्तारुढ असलेल्या माकपने विधानसभा निवडणुकीकरता 83 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यात 5 मंत्र्यांसह समवेत 25 आमदारांना दोन कार्यकाळांच्या नियमामुळे यादीतून वगळण्यात आले आहे. याचबरोबर यात 9 अपक्ष उमेदवार असून त्यांना माकप समर्थन देणार आहे. पक्षाने राज्यभरात ‘टू टर्म नॉर्म’च्या विरोधात होत असलेल्या निदर्शनांची पर्वा न करता उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. टू टर्म नॉर्म अंतर्गत सलग दोनवेळेपासून आमदार असलेल्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. मुख्यमंत्री पी. विजयन हे कुन्नूर जिल्हय़ातील धर्मादम मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. माकपच्या पहिल्या यादीत 17 मुस्लीम उमेदवार आहेत.
सुमारे दोन दशकांनंतर केरळमध्ये अर्थमंत्री टी.एम. थॉमस इसाक, ए.के. बालन आणि जी. सुधाकरन यासारखे वरिष्ठ माकप नेते आणि मंत्री राजकीय मैदानात नसतील. इसाक चारवेळेपासून आमदार आणि दोनवेळा मंत्री राहिले आहेत. तर सुधाकरन तीन वेळेपासून आमदार आणि मंत्री आहेत. त्यांना केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांच्या तोडीचा नेता मानले जाते. बालन देखील तीन वेळेपासून सातत्याने आमदार होते. या सर्वांना टू टर्म नॉर्म अंतर्गत उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
उमेदवारांच्या यादीनंतर पिनाराई विजयन यांनी पक्षाला पूर्ण नियंत्रणात आणण्याच्या दिशेने पावले टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व वरिष्ठ आणि जुन्या नेत्यांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यात आले आहे. इसाक, बालन, सुधाकरन हे नेतेच विजयन यांना प्रश्न विचारू शकत होते. पण निवडणुकीनंतर पक्षावर पूर्णपणे विजयन यांचे नियंत्रण असणार आहे.
माकप स्वतःचा अखेरचा बालेकिल्ला वाचविण्यासाठी या निवडणुकीला करा किंवा मरा अशी स्थिती मानत आहे. याचमुळे युडीएफच्या तुलनेत अधिक प्रमाणात तरुणाईला उमेदवारी देण्याची योजना आहे. 33 आमदारांना वगळून माकप सत्ताविरोधी भावनेचा प्रभाव कमी करू पाहत आहे.
केरळ काँग्रेसला जागा देण्याची तयारी
पहिल्यांदाच एलडीएफमध्ये सामील झालेल्या केरळ काँग्रेस (एम)ला माकप 13 जागा देण्यास तयार आहे. या पक्षाच्या माध्यमातून माकप राज्यातील ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करू पाहत आहे. केरळ काँग्रेस (एम)चा ख्रिश्चनांमध्ये मोठा प्रभाव आहे.
तरुणाईला प्रतिनिधित्व
माकपच्या 83 उमेदवारांपैकी 48 उमेदवार पदवीधर आहेत. दोघे पीएचडी, दोन जण एमबीबीएस, 14 पदव्युत्तर आणि 22 कायद्याचे पदवीधारक उमेदवार आहेत. तर चार उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. 8 उमेदवारांचे वय 31-41 वर्षांदरम्यान आहे. 13 उमेदवार 41-51 वयोगटातील आहेत. 33 उमेदवार 51 ते 61 वर्षांदरम्यानचे आहेत. उर्वरितांचे वय 61 वर्षांपेक्षा अधिक आहे. यादीत 12 महिलांची नावे सामील आहेत. यात मंत्री के.के. शैलजा आणि जे. मर्सिकुट्टी अम्मा देखील सामील आहेत. यादीत 75 वर्षीय मुख्यमंत्री पी. विजयन सर्वाधिक वयाचे उमेदवार आहेत.









