क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएलच्या उपान्त्य लढतीच्या दुसऱया लेगमध्ये आज मंगळवारी केरळ ब्लास्टर्स एफसीचा सामना जमशेदपूर एफसी संघाशी होणार आहे. पहिल्या लेगमध्ये केरळ ब्लास्टर्सने जमशेदपूरचा एकमेव गोलने पराभव केला होता. वास्कोतील टिळक मैदानावर होणाऱया या लढतीत केरळ ब्लास्टर्सला अंतिम फेरीत जाण्याची संधी चालून आली आहे तर शील्ड विजेत्या जमशेदपूरची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जमशेदपूरची यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी झाली असून अनेक स्पर्धा विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर आहे. मात्र पहिल्या लेगमध्ये सहल समदने केलेल्या गोलमुळे त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बाद फेरीची सुरूवात अपयशी झाली तरी आम्ही आमचा अप्रोच बदलणार नसल्याचे जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल म्हणाले. अंतिम फेरी गाठायची असेल तर किमान 2-1 अशा फरकाने विजय मिळवावा लागेल, असे ते म्हणाले. पहिल्या लेगमध्ये समदचा गोल निर्णायक ठरला असला तरी जमशेदपूरसाठी डॅनियल चिमाने दोन वेळा गोल करण्यात चुकला तसेच ग्रेग स्टीव्हर्टला सातत्य राखता आले नाही. आता या दोन्ही खेळाडूंसह संघातील प्रत्येक खेळाडू मैदानावर 100 टक्के योगदान देईल, असे कॉयल म्हणाले.
लीगमधील सवोत्तम कामगिरी पाहता पीहल्या लेगमध्ये जमशेदपूरविरूद्ध केरळसमोर खेळ उंचावण्याचे आव्हान होते. त्यांनी आपला खेळ उंचावताना जमशेदपूरची सात विजयाची मालिका खंडीत केली. अव्वल संघाविरूद्धच्या विजयामुळे केरळ ब्लास्टर्सचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि त्याचा फायदा त्यांना आज होऊ शकतो.
पहिल्या लेगमध्ये आम्ही चांगला खेळ केला. त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. मात्र, त्या निकालाचा आम्ही फार विचार करत नाही. विजयी आघाडीनंतर सर्वांकडून आमच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची धमक आमच्यात आहे, असे केरळ ब्लास्टर्सचे प्रशिक्षक वुकोमॅनोविक म्हणाले.









