ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीसी चाको यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करत पक्षाला धक्का दिला. चाको यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.
राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पीसी चाको म्हणाले, केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकावा अशी जनतेची इच्छा आहे, पण काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते शक्य नाही. गटबाजी नष्ट करण्याबाबत मी पक्षाच्या हायकमांडशी अनेकदा बोललो. पण पक्षाच्या हायकमांडने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मी राजीनामा देण्याचा विचार करत होतो. अखेर आज मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
चाको हे केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले होते. दरम्यान, केरळ विधानसभेची 140 जागांसाठी 6 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.









