केरळमध्ये कोविड-19 चा वेगळाच कल दिसून येत आहे. पूर्ण देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना केरळमध्ये याच्या उलट स्थिती आहे. कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होताना दिसून येत आहे. मागील एक आठवडय़ापासून केरळने सक्रीय रुग्णांची संख्या कमी करण्यास मोठे यश प्राप्त केले आहे.
राज्यात रुग्णांपेक्षा अधिक प्रमाण बरे होणाऱयांचे आहे. 6 एप्रिल रोजी केरळमध्ये 266 सक्रीय रुग्ण होते. तर तेथील एकूण रुग्णांची संख्या 327 होती. 6 एप्रिल रोजी 59 जण कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त झाले आहेत. पुढील दिवसांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या वेगाने घटत बरे होणाऱया लोकांचे प्रमाण वाढले आहे. 7 एप्रिल रोजी सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत 263 झाली आणि त्यानंतर 71 जण संसर्गातून मुक्त झाले आहेत.
सक्रीय रुग्णांची संख्या 8 एप्रिल रोजी 259 होती, तर बरे झालेल्या लोकांचा आकडा 84 वर पोहोचला. 9 एप्रिल रोजी सक्रीय रुग्णांचा आकडा 258 असताना संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 97 वर गेली. 10 एप्रिल रोजी 238 सक्रीय रुग्ण असताना कोरोनापासून मुक्ती मिळविणाऱयांची संख्या 124 झाली होती.
11 एप्रिल रोजी 228 सक्रीय रुग्ण होते आणि आजारातून बरे झालेल्यांचा आकडा 143 वर पोहोचला. 12 एप्रिल रोजी 194 सक्रीय रुग्ण असताना संसर्गमुक्त झालेल्यांचा आकडा 179 वर गेला होता. 12 एप्रिल रोजी केरळमध्ये एकूण रुग्णांचा आकडा 375 वर पोहोचला असताना 194 सक्रीय रुग्ण होते. तर संसर्गावर मात केलेल्या लोकांचा आकडा 179 वर गेला आहे.
आश्वासक..
केरळमध्ये 21 दिवसांची टाळेबंदी पूर्ण झाली आहे. राज्याने केंद्र सरकारच्या घोषणेपूर्वीच टाळेबंदी लागू केली होती. टाळेबंदी वाढविण्यात येणार असली तरीही यावेळी काही सवलती देण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार असली तरीही काही दुकाने आणि उद्योग सुरू करण्याची अनुमती दिली जाणार आहे. परंतु याकरता सरकारकडून काही नियम लागू करण्यात येणार आहेत. तसेच सोशल डिस्टेंसिंगसंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. देशात कोरोना रुग्ण सापडणारे केरळ पहिले राज्य ठरले होते. परंतु तेथे रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आश्वासक चित्र दिसून येत आहे.









