देशातील रुग्णांनी 81 लाखांचा टप्पा ओलांडला : संसर्ग वाढल्यामुळे चिंता वाढली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 81 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 81 लाख 37 हजार 119 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यापैकी 74 लाख 32 हजार 829 लोक बरे झाल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत 1 लाख 21 हजार 641 रुग्ण संक्रमणामुळे मरण पावले आहेत. दरम्यान, दररोज आढळणाऱया कोरोना प्रकरणात केरळ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे. केरळमध्ये दररोज 6 ते 7 हजार लोकांना संसर्ग होत आहे. 5 ते 6 हजार नव्या रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱया क्रमांकावर आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 7 हजार 20 आणि महाराष्ट्रात 5 हजार 902 प्रकरणे आढळली. त्यापूर्वी गुरुवारी केरळमध्ये 6,638 नवीन रुग्ण आढळले तर महाराष्ट्रात 6,190 रुग्ण आढळले होते. एकूणच सक्रिय प्रकरणे वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असले तरी देशातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. गुरुवारी सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. अजूनही देशात 5 लाख 82 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









