केरळमध्ये एलडीएफ सरकारच्या विरोधात अनेक मोठे मुद्दे असतानाही काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी पक्षाचे स्टार प्रचारक आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. राहुल एकीकडे माकपच्या शक्तिशाली निवडणूक मोहिमेला तोंड देत आहेत. तर दुसरीकडे गटबाजीत अडकलेल्या राज्यातील काँग्रेसची प्रचारमोहीम पेलावी लागत आहे. अथक प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या विखुरलेल्या प्रचारमोहिमेला मार्गावर आणण्यास ते यशस्वी होताना दिसून येत असले तरीही सत्तेवर येण्यासाठी अधिक जोर लावावा लागणार आहे.
डाव्यांनी बदलली रणनीति
काँग्रेसची प्रचारमोहीम रुळावर आल्याने वाढलेले धोके ओळखून डाव्या पक्षांनीही राहुल गांधी यांच्यावर राजकीय हल्ले सुरू केले आहे. तर प्रत्युत्तरादाखल राहुल गांधी एलडीएफच्या विरोधात आक्रमकता दाखवत आहेत. तिकिटवाटपातून निर्माण झालेल्या प्रचंड नाराजीसह वरिष्ठ नेत्यांच्या उघड गटबाजीने राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराला मोठा फटका बसला होता.
राहुल यांनी लावला जोर
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमान चंडी पक्षाचा विश्वासार्ह चेहरा म्हणून प्रचारात एकटेच दिसून येत होते. पण अशा स्थितीत काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत उत्साहाचा अभाव दिसून येत होता. याचदरम्यान निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये एलडीएफ सत्ता राखणार असल्याच्या अनुमानांनी काँग्रेसमधील अंतर्गत निरुत्साह अधिकच वाढला होता. पण राहुल यांनी मागील काही दिवसांमध्ये स्वतःच्या प्रचारसभा, कोपरासभा, रोड शो आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद करून अचानक पक्षाच्या प्रचारात धुगधुगी निर्माण केली आहे.
एलडीएफकडून लक्ष्य विद्यार्थ्यांना मार्शल आर्टचे धडे देण्यापूर्वी राहुल यांनी केरळमधील स्वतःच्या नेत्यांना शिकवण द्यावी असा खोचक सल्ला भाकप महासचिव डी. राजा यांनी दिला होता. राजा यांचा काँग्रेसमधील गटबाजीच्या दिशेने इशारा होता. गटबाजीमुळेच राहुल यांनी राज्यातील सभांचे प्रमाण वाढविले आहे. पक्षाच्या नेत्यांमध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी सर्व गटांच्या नेत्यांना स्वतःच्या प्रचारात सामील करून कलह समाप्त झाल्याचा संदेश ते देत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने महिला काँग्रेस अध्यक्षा लतिका सुभाष यांनी निषेधादाखल मुंडन करून पक्षाला सोडचिठ्ठी देणे, वरिष्ठ नेते के. सुधाकरन यांनी रमेश चेन्निथला आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे काँग्रेस पक्ष राज्यात बॅकफूटवर गेला होता









