ऑनलाईन टीम / तिरूवनंतपूरम :
केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. संसर्गाचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शुक्रवारी दिली.

त्यातच दिलासा देणारी बाब म्हणजे, ज्या चार जिल्ह्यात कठोर लॉकडाऊन लावण्यात आले होते त्यातील तीन जिल्ह्यातील म्हणजेच तिरूवनंतपूरम, एर्नाकुलम, त्रिशुर मधील लॉकडाऊन उद्यापासून हटविण्यात येणार आहे. कारण या भागातील पॉझिटिव्ह आणि ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. माात्र, मलप्पुपुरम या भागातील लॉकडाऊन कायम असणार आहे, असेही पिनराई विजयन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी लॉकडाऊन वाढीसोबतच पिनराई विजयन यांनी मागील 24 तासात वाढलेल्या रुग्ण वाढीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या 24 तासात राज्यात 29,673 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 142 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत राज्यातील 6,994 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात 41,032 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 19 लाख 79 हजार 919 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.









