नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग चिंताजनक प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. कारण, देशात 24 तासात नोंद झालेल्या 41 हजार 965 नव्या कोरोनाबाधितांपैकी 30 हजार 203 रुग्ण एकटय़ा केरळमधील आहेत. तर या एका दिवसांतील 460 मृत्यूंपैकी 115 मृत्यू केरळमध्ये झाले असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातही मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी 4 हजार 196 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याचदरम्यान 4 हजार 688 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 104 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 41 हजार 965 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत कोरोनावर उपचार घेणाऱयांचा एकूण आकडा 3 लाख 78 हजार 181 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच 24 तासांत देशात 33 हजार 964 जण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 3 कोटी 19 लाख 93 हजार 644 वर पोहोचली आहे. दरम्यान, या एका दिवसातील नव्या रुग्णांचा आकडा हा कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 28 लाख 10 हजार 845 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी, 3 कोटी 19 लाख 93 हजार 644 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता थेट 4 लाख 39 हजार 20 वर पोहोचला आहे. त्यामुळे, निश्चितच कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.








