दररोज 12 किमी पायपीट केल्यावरच शिक्षण
स्वतःच्या भागांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने अडचण
केरळच्या इडुक्की जिल्हय़ाच्या दुर्गम भागांमध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. येथील मुन्नारमध्ये कानन हिल्स चहामळय़ांच्या राजमाला इस्टेट डिव्हिजनमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज 12 किलोमीटरची पायपीट करून एराविकुलम नॅशनल पार्कमध्ये जावे लागते. तेथे नेटवर्क असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावरच त्यांचे शिक्षण सुरू होते.
मागील वर्षापासून कसरत
हे मुले मागील वर्षाच्या जूनपासून अशाप्रकारेच ऑनलाईन वर्गात सामील होत आहेत. ऑनलाईन वर्गासाठी दररोज नॅशनल पार्कमध्ये जावे लागते, कारण चहाच्या मळय़ांमधील वस्तीत नेटवर्क मिळत नसल्याचे अकरावीची विद्यार्थिनी अपर्णा सांगते. पार्कमध्ये रस्त्यांच्या कडेला मोबाइलसोबत बसलेल्या मुलांचे दृश्य कित्येक महिन्यांपासून पाहत आहे. पार्कमध्येही एकाच ठिकाणी चांगले नेटवर्क मिळत असल्याचे नॅशनल पार्कचे सहाय्यक वन्यजीव संरक्षक जे. नेरियाम्परम्पिल यांनी सांगितले आहे. डोंगराळ जिल्हा असलेल्या इडुक्कीतील अनेक भागांमध्ये नेटवर्कचा अभाव असल्याचे मुन्नार पोलीस उपनिरीत्रक टी.एम. सूफी यांनी म्हटले आहे.
प्रशासनाला उशिरा जाग
ऑनलाईन शिक्षण घेता येत नसलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा जमवत आहोत. प्रारंभिक आकडेवारीनुसार अशा मुलांची संख्या 2015 इतकी असल्याचे सर्व शिक्षण मोहिमेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बिंदुमोल यांनी सांगितले आहे. दोन आठवडय़ांमध्ये राजमाला येथे नेटवर्क कनेक्शन सुनिश्चित केले जाईल. खासगी कंपनी लवकरच मोबाईल टॉवर बसविणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी एच. दिनशान यांनी केला आहे.









