सातारा / प्रतिनिधी :
केरळ राज्यातील पलक्कड येथील क्रेडिट सोसायटीतील तब्बल साडेसात किलो सोने लुटून फरार झालेल्या व साताऱ्यात वास्तव्यास असलेल्या परेश अशोक अंबुर्ले उर्फ निखील अशोक जोशी याला केरळ पोलिसांनी अटक केल्याने मोठ्या चोरी प्रकरणाशी साताऱ्याचे कनेक्शन पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. विशेषतः जोशी हा काही सराफांच्या संपर्कात होता तर तो ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत होता या सर्वांचेच धाबे आता दणाणले आहेत.
26 जुलै रोजी पलक्कड येथील मारुथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी बँकेतून तब्बल साडे सात किलो सोने व 18 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. केरळ पोलिसांनी या सर्वात मोठ्या चोरीप्रकरणी यातील मुख्य आरोपी असलेल्या निखील जोशी याला साताऱ्यात अटक केली असून, त्याच्यासोबत साताऱ्यातील पैलवान सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे या साताऱ्यातील संशयितांना सोबत घेवून पोलिसांनी केरळ गाठले आहे. हा जोशी साताऱ्यातील अनेक सराफ, हॉटेल चालक आणि डॉक्टर नातेवाईकांमध्ये संपर्कात होता. केरळ पोलिसांसह सातारा पोलीस देखील या सर्वांवर वॉच ठेवून आहेत.









