वार्ताहर/ केपे
केपे नगरपालिका प्रभागांतून बिनविरोध उमेदवार निवडून येण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली असून शनिवारी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेत जे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते त्यांच्या प्रभागांत दोन अर्ज दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे समर्थक यापूर्वी तीन प्रभागांतून बिनविरोध निवडून आले होते. प्रभाग 1 मधून चेतन हळदणकर, प्रभाग 3 मधून सुचिता शिरवईकर व प्रभाग 7 मधून दयेश नाईक बिनविरोध निवडले गेले होते. मात्र आता प्रभाग 1 व 4 मधून योगेश बेणे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत, तर प्रभाग 3 मधून नझमोनिसा खान यांनी अर्ज दाखल केल्याने या प्रभागांतून बिनविरोध निवडून येण्याची शक्यता मावळली आहे. तर प्रभाग 7 मध्ये दयेश नाईक यांच्या विरोधात चेतन नाईक यांना उतरविण्याच्या हालचाली काँग्रेसने चालवल्या आहेत. यामुळे केपेत आता उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्मयता कमीच आहे.
तसेच प्रभाग 8 मधून माजी नगरसेवक अमोल काणेकर यांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल केली आहे. काणेकर हे या प्रभागातून यापूर्वी दोन वेळा निवडून आले आहेत. आतापर्यंत 16 अर्ज दाखल करण्यात आले असून सोमवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊ शकते.









