भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे प्रतिपादन, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी कसोटी 11 जानेवारीपासून
जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात विराट कोहली पुनरागमन करण्याची अपेक्षा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली. भारतीय संघाला वांडरर्सवर दुसऱया कसोटी सामन्यात 7 गडय़ांनी दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर द्रविड पत्रकार परिषदेत बोलत होते. जोहान्सबर्ग कसोटीत विराट पाठदुखीच्या समस्येमुळे खेळू शकला नव्हता.
‘वांडरर्सची खेळपट्टी दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक होती. दक्षिण आफ्रिकन संघाने चौथ्या डावात उत्तम फलंदाजी केली. आम्हाला मात्र फलंदाजीच्या आघाडीवर बरीच सुधारणा करावी लागेल. जर मोठी भागीदारी सातत्याने होत राहिली तर आव्हान उभे करता येऊ शकते. पहिल्या डावात आव्हानात्मक स्थिती होती. मात्र, आणखी 55-60 धावा जमवणे शक्य झाले असते तर खूप फरक पडला असता’, असे द्रविड पुढे म्हणाले.

‘मोठी खेळी साकारली जाणे नेहमीच महत्त्वाचे असते. पहिल्या कसोटीत केएल राहुलने शतक साजरे केले आणि आम्ही विजयश्री संपादन केली. येथे एल्गारने 96 धावा जमवल्या आणि द. आफ्रिकन संघ विजयरथावर आरुढ झाला’, याचाही द्रविड यांनी उल्लेख केला.
‘हनुमा विहारी दोन्ही डावात अतिशय उत्तम खेळला. श्रेयस अय्यरने यापूर्वी अनेकदा लक्षवेधी डाव साकारले आहेत. आम्ही येथील कसोटीत अल्पसंतुष्ट होतो, असे मला अजिबात म्हणायचे नाही. शेवटच्या डावात 240 धावांचे संरक्षण करणे कठीण असेल, याची कल्पना होती. मात्र, पहिल्या टप्प्यात काही धक्के देता आले असते तर वेगळे चित्र दिसू शकले असते. यापुढील वाटचालीत आम्हाला यापासून धडा घ्यावा लागेल’, असे ते शेवटी म्हणाले.
जोहान्सबर्गवर डीन एल्गारने नाबाद 96 धावांची नेतृत्वाला साजेशी खेळी साकारताना दक्षिण आफ्रिकेला मालिकेत महत्त्वाची बरोबरी मिळवून दिली. यजमान संघ पहिल्या लढतीनंतर 0-1 फरकाने पिछाडीवर होता. पण, जोहान्सबर्गची कसोटी जिंकल्याने त्यांना 1-1 अशा बरोबरीत येता आले. उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी आता दि. 11 जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळवली जाणार आहे.
बॉक्स
पुजारा-अजिंक्य रहाणेच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणार
कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये असले तरी यापुढेही त्यांना शक्य तिथवर संधी देण्याचे संकेत द्रविड यांनी येथे दिले. वरिष्ठ फळीतील खेळाडू खेळत असेतोवर हनुमा विहारी व श्रेयस अय्यर यांना नियमित स्थान मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे द्रविड याप्रसंगी म्हणाले. आपल्या कसोटी कारकिर्दीतील 13 पैकी केवळ एकच सामना मायदेशात खेळण्याची संधी मिळालेल्या विहारीला कर्णधार कोहली व श्रेयस अय्यर उपलब्ध नसल्यामुळेच जोहान्सबर्ग कसोटीत जागा मिळाली होती.
बॉक्स
केपटाऊन कसोटीत सिराजच्या उपलब्धतेबद्दल साशंकता
जलद गोलंदाज मोहम्मद सिराज धोंडशिरेच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नसून यामुळे केपटाऊन येथील तिसऱया कसोटीत तो खेळणार का, याबद्दल साशंकता असल्याचे द्रविड यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
‘सध्याच्या घडीला सिराज पूर्ण तंदुरुस्त नाही. आणि पुढील 4 दिवसानंतर फिजिओंच्या चाचणीनंतर याबाबत चित्र स्पष्ट होऊ शकेल. दुखापतग्रस्त असतानाही सिराजने गोलंदाजी करणे कौतुकास्पद होते. पण, तो 100 टक्के तंदुरुस्त नसल्याने आम्ही पहिल्या डावाप्रमाणे दुसऱया डावात त्याच्याकडून गोलंदाजी करवून घेऊ शकलो नाही आणि याचा आमच्या रणनीतीवर विपरित परिणाम दिसून आला’, असे ते पुढे म्हणाले.
बॉक्स
द्रविड यांची फटक्यांच्या टायमिंगबद्दल रिषभ पंतशी ‘चर्चा’
दुसऱया डावात खराब फटक्यावर विकेट बहाल करणाऱया यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत टीकेचे मुख्य लक्ष्य ठरत आला असून या पार्श्वभूमीवर, द्रविड यांनी आपण फटक्यांच्या टायमिंगबद्दल पंतशी चर्चा केली असल्याचे यावेळी नमूद केले. पंतने सकारात्मक फलंदाजी करावी, असे नेहमी वाटते. पण, फटक्यांची निवड वेगळय़ा प्रकारे आवश्यक असेल, असे ते म्हणाले.
जोहान्सबर्ग कसोटीतील दुसऱया डावात रिषभ पंत आपल्या तिसऱयाच चेंडूवर रबाडाला स्मॅश करण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देत तंबूत परतला आणि आपली विकेट अक्षरशः बहाल केल्यामुळे तो टीकेच्या केंद्रस्थानी राहिला होता.
‘पंतचा आक्रमक शैलीवर भर असतो आणि याच बळावर काही षटकात तो एखाद्या सामन्याचे पूर्ण चित्र बदलून टाकू शकतो. पण, आक्रमक फटके खेळण्याच्या प्रयत्नात चुका देखील होत असतात. यातून बोध घेत प्रगल्भतेच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु आहे’, असे द्रविड तपशीलवार बोलताना म्हणाले.









