बर्मिंगहम / वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन यजमान इंग्लंडविरुद्ध आजपासून (गुरुवार दि. 10) खेळवल्या जाणाऱया दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर फेकला गेला आहे. डाव्या ढोपराला दुखापत झाल्याने तो येथे खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, भारताविरुद्ध आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तो उपलब्ध असेल, असे संकेत आहेत. विल्यम्सनच्या गैरहजेरीत इंग्लंडविरुद्ध लढतीत डावखुरा फलंदाज टॉम लॅथम किवीज संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.
लॅथमने न्यूझीलंड संघाचे नेतृत्व भूषवण्याची ही केवळ तिसरी वेळ असणार आहे. दुखापतग्रस्त विल्यम्सनची जागा विल यंग घेईल, असे न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केले. विल्यम्सनला मार्च महिन्यापासून ही दुखापत सतावत असल्याचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी नमूद केले. न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्ध येथील लढतीत काही जलद गोलंदाजांना विश्रांती देण्याचीही शक्यता आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट फायनल दि. 18 जूनपासून खेळवली जाणार आहे.
जेव्हा आगीत भस्मसात पदके परत मिळतात..…
मॉन्ट्रियल ः कॅनडाची डायव्हिंग ऍथलिट मीघन बेन्फिटो हिची 3 ऑलिम्पिक पदके व पॅन अमेरिकन गेम्समधील 2 पदके जानेवारीत 15 मजली आलिशान इमारतीला लागलेल्या आगीत अक्षरशः भस्मसात झाली. मात्र, तिच्या भावना लक्षात घेत 5 महिन्यांनंतर बेन्फिटोला नव्या पदकांनी सन्मानित केले गेले. बेन्फिटोने यातील ऑलिम्पिक पदके 2012 व 2016 मध्ये जिंकली आहेत. सुरक्षेसाठी आता तिने ही पदके आपल्या पालकांकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 32 वर्षीय बेन्फिटो यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी होत आहे.









