वेलिंग्टन / वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन पुढील महिन्यात सुरु होणाऱया इंग्लंड दौऱयात कसोटी पुनरागमन करणार आहे. किवीज व्यवस्थापनाने बुधवारी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. त्यात विल्यम्सनचा प्राधान्याने समावेश आहे. उभय संघातील पहिली कसोटी दि. 2 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार असून मागील नोव्हेंबरनंतर तो प्रथमच या क्रिकेट प्रकारात खेळेल. विल्यम्सन ढोपराच्या दुखापतीमुळे अलीकडेच मायदेशात संपन्न झालेल्या बांगलादेश व दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळू शकला नव्हता. नवोदित अष्टपैलू मायकल ब्रेसवेलचा या संघात समावेश आहे. शिवाय, कॅम फ्लेचर, ब्लेयर टिकनर, जेकब डफी यांना अंतिम 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले तर त्यांना कसोटी पदार्पणाची संधी असेल.
न्यूझीलंड संघ ः केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, टॉम ब्लंडेल, मायकल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनव्हे, कॉलिन डे ग्रँडहोम, जेकब डफी, कॅमेरुन फ्लेचर, मॅट हेन्री, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, रचिन रविंद्र, हमिश रुदरफोर्ड, टीम साऊदी, ब्लेयर टिकनर, नील वॅग्नर, विल यंग.









