अमेरिकेची काही विमाने नष्ट केल्याचा दावा, जीवीतहानी नाही
नैरोबी / वृत्तसंस्था
सोमालियातील अल शबाब या दहशतवादी संघटनेने केनियातील अमेरिकेच्या सेनातळावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अमेरिकेची काही लढाऊ विमान नष्ट केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला. या सेनातळाचा उपयोग अमेरिका आणि केनियाचे सैनिक करत होते. सैनिकांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी पहाटेपूर्वी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी या तळात घुसून गोळीबार केला. तसेच हातबाँब फेकले. या हल्ल्यात चार लढाऊ विमाने आणि काही वाहने याचे नुकसान झाले, अशी माहिती केनियाच्या स्थानिक प्रशासनाने दिली. तथापि, अमेरिका आणि केनियाचे तळावरील सैनिक सुरक्षित आहेत.
शुक्रवारी अल शबाबच्या काही दहशतवाद्यांना या तळाजवळ पाहिल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले होते. तथापि, स्थानिक प्रशासनाने या दहशतवाद्यांवर त्याचवेळी कारवाई केली नाही, असेही सांगण्यात येत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने कोणत्याही ढिलाईच्या आरोपाचा इन्कार केला आहे.
चार दहशतवादी ठार
काही हातबाँब तळावर फेकण्यात आले असले तरी हा हल्ला यशस्वी झालेला नाही. तो मोडून काढण्यात आला आहे. तळावरच्या सैनिकांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, असे केनियाच्या प्रशासनाने वृत्तसंस्थांशी बोलताना रविवारी दुपारी स्पष्ट केले.
धावपट्टीला धोका नाही
या तळावर लढाऊ विमानांची नेहमी ये जा असते. त्यासाठी धावपट्टी बनविण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात या धावपट्टीचेही कोणतेही नुकसान झालेले नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. हल्ल्यानंतर काहीकाळ तळ बंद ठेवण्यात आला होता. मात्र तो आता सुरू करण्यात आला आहे.
शबाबने जबाबदारी स्वीकारली
अल् शबाब या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. केनियातून अमेरिकेच्या सैनिकांची हकालपट्टी करणे हा या हल्ल्याचा उद्देश असल्याचे या संघटनेकडून सांगण्यात येत आहे. तळात गुप्तपणे प्रवेश करून कार्यभाग साधण्यात आला, असे या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे.









