क्विटोव्हाचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ पॅरिस
अमेरिकेच्या सोफिया केनिनने प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवित दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. शनिवारी होणाऱया अंतिम फेरीत तिची लढत पात्रता फेरीतून आलेल्या पोलंडच्या इगा स्वायटेकशी होणार आहे.
चौथे मानांकन असलेल्या 21 वर्षीय सोफियाने यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. आठ वर्षांच्या खंडानंतर उपांत्य फेरी गाठलेल्या झेकच्या सातव्या मानांकित पेत्रा क्विटोव्हाचे स्वप्न उद्ध्वस्त करताना केनिनने तिचा 6-4, 7-5 असा पराभव केला. ‘मला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार, याची पूर्ण जाणीव होती आणि अंतिम फेरी गाठल्याने मी एकदम खुशीत असून मला त्याचा अभिमानही वाटतो,’ अशा भावना केनिनने व्यक्त केल्या. 19 वर्षीय स्वायटेकने त्याआधी अर्जेन्टिनाच्या पात्रता फेरीतून आलेल्या नादिया पोडोरोस्काचा 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. स्वायटेक ही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी 81 वर्षांनंतरची पोलंडची पहिली महिला आहे.
2016 नंतर एकाच वर्षात दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी पहिली महिला होण्याची केनिनला संधी मिळाली आहे. त्यावर्षी जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकल्या होत्या. ‘मी ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली असून या आठवडय़ात मला अवघड सामने खेळावे लागले आहेत. त्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला आहे,’ असेही केनिन म्हणाली. या मोसमाआधी केनिनला क्ले कोर्टवरील स्पर्धेत एकदाही उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नव्हती. येथील स्पर्धेआधी तिला रोममध्ये झालेल्या क्ले कोर्टवरील एकमेव सामन्यात अझारेन्काकडून 6-0, 6-0 असा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. येथे उपांत्य फेरी गाठेपर्यंत पाचपैकी चार सामन्यात तिला तीन सेट्समध्ये खेळावे लागले आहे.
21 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंत ग्रँडस्लॅमच्या जेतेपदाची लढत होण्याची 2008 नंतरची ही पहिलीच वेळ असेल. 2008 मध्ये रशियाच्या 20 वर्षीय मारिया शरापोव्हाने तिच्याच वयाच्या ऍना इव्हानोविकचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत 54 व्या क्रमांकावर असणाऱया स्वायटेकने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमवेलेला नाही. आतापर्यंतच्या सहा सामन्यात तिने फक्त 23 गेम्स गमविले आहेत. एकही सेट न गमविता ही स्पर्धा जस्टिन हेनिनने 2007 मध्ये जिंकली होती. त्या पराक्रमाची बरोबरी करण्याची संधी स्वायटेकला मिळाली आहे. टूर स्तरावर तिची केनिनशी एकदाही गाठ पडलेली नाही. मात्र 2016 मध्ये येथील स्पर्धेत मुलींच्या (कनिष्ठ गटात) एकेरीत तिने केनिनला हरविले होते.
स्पेनचा राफेल नदाल अंतिम फेरीत
पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालने 13 व्या वेळी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठत 20 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्याने उपांत्य लढतीत अर्जेन्टिनाच्या बाराव्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनचा 6-3, 6-3, 7-6 (7-0) असा पराभव केला. दोन आठवडय़ापूर्वी रोममध्ये झालेल्या स्पर्धेत श्वार्ट्झमनने नदालला हरविले होते, त्या पराभवाची परतफेड नदालने येथे केली. रविवारी जोकोविच किंवा सित्सिपस यापैकी एकाशी त्याची जेतेपदाची लढत होईल. त्याने जेतेपद मिळविल्यास रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी तो बरोबरी साधणार आहे. नदालने यावर्षीच्या स्पर्धेत एकही सेट न गमविता अंतिम फेरीत धडक मारली आहे.









