वार्ताहर/ कडोली
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेला लॉकडाऊन एका शेतकऱयाच्या जीवावर बेतल्याची घटना केदनूर येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. उत्पन्नाचे सर्व मार्ग अयशस्वी होऊन घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे शेतकऱयाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे.
केदनूर राजाई गल्लीतील आप्पय्या नागाप्पा राजाई (वय 62) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱयाचे नाव आहे. त्याच्या या आत्महत्येला कोरोना व्हायरसचे लॉकडाऊन कारणीभूत ठरले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद झाल्याने शेतीमाल दराअभावी जागेवरच कुजून गेला. त्यामुळे त्याला शेती व्यवसायातील नुकसानीला सामोरे जावे लागले. शिवाय कामासाठी परगावी गेलेला एकुलता मुलगा लॉकडाऊनमुळे पुण्याहून घरी परतला. त्यामुळे उत्पन्नाचा हा मार्गही बंद होऊन घरची आर्थिक परिस्थिती बिकट बनली. शेती व्यवसायात पुन्हा गुंतवणूक कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला. या नैराश्येतूनच या माळकरी शेतकऱयाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी आप्पय्या शेताकडे जातो म्हणून गेला तो पुन्हा घरी परतलाच नाही. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.









