दोघे युवक जागीच ठार, पादचारी जखमी
प्रतिनिधी / वास्को
विमानतळ नाक्यावरून वेर्णाच्या दिशेने भरधाव निघालेल्या दोघा दुचाकीस्वार युवकांनी मिनी बसला ठोकर दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. अखिलेश गावस (18) व गौतम केळुसकर (19) अशी मयत युवकांची नावे असून ते हेडलॅण्ड सडा व बोगदा भागातील राहणारे आहेत. हा अपघात संध्याकाळी सातच्या सुमारास सांकवाळ झुआरीनगर येथील बीटस् पिलानीसमोरील महामार्गावर घडला.
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत दोघेही युवक आपल्या केटीएम दुचाकीवरून वेर्णाच्या दिशेने जात होते. ते महामार्गावरून सुसाट निघाले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास बिटस् पिलीच्या कँप्सच्या प्रवेशव्दाराबाहेरील नाक्यावर ते अपघातात सापडले व जागीच ठार झाले.
केटीएम दुचाकीची मिनी बसला जोरदार धडक
या नाक्यावर वाहने वळवण्याची सोय असल्याने त्याच ठिकाणी एक खासगी मिनी बस दाबोळी विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी वळण घेत होती. त्याच वेळी पोहोचलेल्या दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने वळण घेणाऱया बसवर केटीएम दुचाकीने धडक दिली. त्यामुळे दोघेही बसला आदळून रस्त्यावर फेकले गेले.
बिचारी पादचारी महिलाही हकनाक जखमी
हा अपघात किती भीषण होता, याची कल्पना त्याच्या परिणामांवरुन येते. कारण या अपघातात एक पादचारी माहिलाही जखमी झाली. तिचे नाव परूल नाईक असे असून दुचाकीची धडक बसला बसताच ती दुचाकी पादचारी महिलेला जाऊन धडकली. त्यामुळे ाrतच्या पायाचे हाड मोडले. तिला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्यासह वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह मडगावच्या हॉस्पिसियोमध्ये पाठवून दिले. वेर्णा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केलेला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









