ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणालेे, जर केंद्र सरकारने कोरोनाची लस मुफ्तमध्ये नाही उपलब्ध करून दिली तर दिल्ली सरकार लोकांना निःशुल्क लस उपलब्ध करून देईल.

केजरीवाल म्हणाले की, 16 तारखेपासून दिल्लीत कोरोना लस दिली जाणार आहे, याचा मला आनंद आहे. सर्वप्रथम कोरोना वॉरियर्सना लस दिली जाईल. मी सर्वांना आवाहन करतो की, याबाबत कोणीही अफवा पसरवू नयेत. केंद्र सरकार आणि संशोधकांनी देखील सर्व नियमांचे पालन करून ही लस उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे याबाबत कोणतीही शंका मनात येऊ देऊ नका, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पुढे ते म्हणाले, मी केंद्र सरकारला देशभरातील सर्व लोकांना मोफत लस देण्याचे आवाहन केले होते. यावर ते काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष आहे. जर केंद्र सरकारने लस विनामूल्य केले नाही तर गरज पडल्यास आम्ही ही लस दिल्लीतील नागरिकांना विनामूल्य देऊ.









