ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी भाजपने सोमवारी रात्री उशिरा जाहीर केली. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली होती. मित्रपक्षांमुळे भाजपला सर्व यादी जाहीर करता आली नव्हती. काल रात्री उशिरा त्यांनी दुसरी यादी जाहीर केली.
ऐन निवडणुकीच्या काळातच शिरोमणी अकाली दलाने भाजपची 21 वर्षांची साथ सोडली आहे. दिल्लीमध्ये अकाली दल नेहमीच भाजपसोबत निवडणूक लढवितो. मात्र, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपने अकाली दलावर दबाव टाकला होता. त्यामुळे या कायद्यावर भाजप जोपर्यंत भूमिका घेत नाही. तोपर्यंत आम्ही भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका अकाली दलाने घेतली आहे. कोणताही अकाली दलाचा नेता अपक्ष निवडणूक लढविणार नाही.
अकाली दलाने भाजपची साथ सोडल्याने भाजपाला नितिशकुमार यांचा संजद आणि लोक जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला असून, हे दोन पक्ष तीन जागा लढविणार आहेत.
उर्वरित 10 जागांवर नवी दिल्लीहून सुनील यादव, महरौलीहून कुसुम खत्री, तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, शाहदराहून संजय गोयल, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, कृष्णानगरहून अनिल गोयल, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रविंद्र चौधरी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.