मास्कशिवाय चंदीगड-पतियाळात घेतली सभा ः अमृतसर-जालंधरमध्ये धार्मिकस्थळांना भेट
वृत्तसंस्था/ चंदीगड
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे कोरोनाबाधित आढळल्याने पंजाब-चंदीगडमध्ये खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांनी सोमवारी देहरादूनमध्ये सभा घेतली होती, तर तत्पूर्वी चंदीगड आणि पतियाळात जाहीर सभा घेतल्या होत्या. नववर्षात ते अमृतसरमधील धार्मिकस्थळांमध्ये पोहोचले होते. यातील कुठल्याच ठिकाणी केजरीवाल यांनी मास्क घातलेला नव्हता.
केजरीवाल पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षासाठी प्रचार करत आहेत. स्वतःच्या पंजाब दौऱयादरम्यान त्यांनी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. केजरीवाल कोरोनाबाधित आढळल्यावर पंजाबमधील प्रचारसभांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
चंदीगडमध्ये विजय रॅली
अरविंद केजरीवालांनी चंदीगडमध्ये 30 डिसेंबर रोजी विजय रॅली काढली होती. महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष आघाडीवर राहिल्याने काढलेल्या रॅलीत मोठी गर्दी दिसून आली होती. शेकडो लोकांच्या उपस्थितीतही केजरीवालांनी मास्क घातलेला नव्हता. त्यानंतर केजरीवालांनी ट्रक युनियनच्या धरणे आंदोलनात भाग घेतला होता.
शांती मार्चदिनी कोरोना विस्फोट
पतियाळात 31 डिसेंबर रोजी केजरीवालांनी शांती मार्च काढला होता. पंजाबच्या सुवर्ण मंदिरात झालेला अनादर आणि लुधियानात झालेल्या बॉम्बस्फोटावरून त्यांनी ही शांतता फेरी काढली होती. यातही शेकडो लोक सामील झाले होते आणि कुणीच मास्क घातलेला नव्हता. पतियाळात त्याच दिवशी 71 बाधित सापडून एकाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पतियाळातील कोरोना संक्रमणाने वेग पकडला आहे.
भगवंत मान यांच्याही सभा
पतियाळातील सभेनंतर केजरीवाल यांनी दुसऱया दिवशी अमृतसरमागें दिल्ली गाठली. परंतु त्यांचे सहकारी खासदार भगवंत मान यांनी अनेक जिल्हय़ांमध्ये सभा घेतल्या. या सभांदरम्यान मान यांनी कुठेच मास्कचा वापर केलेला नव्हता.
धार्मिकस्थळांना भेट
पंजाब दौऱयादरम्यान केजरीवालांनी पतियाळात काली माता मंदिर आणि गुरुद्वारा श्री दुख निवारण साहिबमध्येही नमन केले होते. त्यानंतर अमृतसर येथील श्रीराम तीर्थस्थानमध्ये त्यांनी डोकं टेकले होते. जालंधर येथील डेरा सचखंड बल्लांमध्ये गेल्यावरही त्यांनी मास्क वापरलेला नव्हता.