सीबीआयचे पाऊल : 45 कोटींचा हिशेब द्यावा लागणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बंगला असलेल्या ‘अरविंद केजरीवाल हाऊस’च्या नूतनीकरणप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून बुधवारी ही माहिती दिली. यासंदर्भात आता सीबीआयने तपास सुरू करत दिल्ली सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाशी संबंधित सर्व फाईल्स मागवल्या आहेत. या तपासात आता केजरीवाल यांच्यासह संबंधित खात्याला 45 कोटींच्या खर्चाचा रितसर हिशेब सादर करावा लागणार आहे.
काही महिन्यांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावरून बराच वाद सुरू झाला होता. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बंगल्याच्या सजावटीवर 45 कोटी ऊपये खर्च केल्याचा आरोप दिल्ली भाजपने केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल टिकू शकत नाहीत, असे दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा यांनी म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी एका खासगी वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केजरीवाल यांच्या बंगल्यातील फोटो समोर आला होता. दिल्लीसह देश कोरोना महामारीशी झुंजत असताना या बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला होता. केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणात मुख्यमंत्री निवासस्थानातील एका पडद्याची किंमत 8 लाख ऊपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे एकूण 23 पडदे मागवण्यात आले. तसेच बसवलेला मार्बल परदेशातून आयात केला होता, असे विविध दावे-प्रतिदावे करण्यात आले होते.