आरोग्य आणि शिक्षणावर या योजनेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित
ऑनलाईन टिम / मुंबई
आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी आरोग्य, शिक्षण, कृषी आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करून देशाला “नंबर वन” बनविण्यासाठी ‘मेक इंडिया नंबर 1’ मिशनची घोषणा केली. दिल्लीतील एका मेळाव्याला संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली.
आपल्या भाषणात बोलताना केजरीवाल म्हणाले की, “स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. या 75 वर्षात आपण खूप काही मिळवलं, पण आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक छोट्या राष्ट्रांनी आपल्याला मागे टाकलं…लोकांमध्ये एकच प्रश्न आहे की भारत मागे का राहिला? प्रत्येक नागरिक हे विचारत आहे,”
पुढे बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले “आम्हाला भारताला पुन्हा एकदा जगातील नंबर 1 राष्ट्र बनवायचे आहे. आपल्याला भारताला पुन्हा महान बनवायचे आहे. आम्ही आज ‘मेक इंडिया नंबर 1’ नावाचे राष्ट्रीय मिशन सुरू करत आहोत. या देशातील प्रत्येक नागरिकाला, 130 कोटी लोकांना या मिशनशी जोडले पाहिजे,” असे ते म्हणाले.
केजरीवाल म्हणाले की, भारताला जगात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी शाळा आणि रुग्णालये उघडणे, युवकांना रोजगार देणे आणि महिलांना समान अधिकार देणे आवश्यक आहे असे सांगून अधोरेखित केले की, हे शक्य करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्याची गरज आहे. आपल्या भाषणात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणचेही नाव न घेता राजकीय कुरघोडी आणि घराणेशाही वर हल्ला चढवला.