प्रतिनिधी / कोल्हापूर
कसून सराव केलेल्या प्रॅक्टीसने पीटीएमवर शानदार एकतर्फी विजय मिळवत सलग दुसऱयांदा केएसए लीग चषकावर कब्जा केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए लीग वरिष्ठ गट (ए डिव्हीजन) फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या प्रॅक्टीस फुटबॉल क्लब (अ)ने पाटाकडील तालीम मंडळ (अ) वर 3-0 गोलने धुव्वा उडविला. प्रॅक्टीसचे प्रशिक्षक म्हणून रिची फर्नांडीस व शरद पवार तर संघव्यवस्थापक म्हणून राजेंद्र वायचळ यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच स्पर्धेत उपविजेता शिवाजी मंडळ, तृतीय फुलेवाडी तर चौथ्या क्रमांकावर बालगोपालला समाधान मानावे लागले.
प्रॅक्टीसने सामना जिंकल्यानंतर समर्थकांनी प्रॅक्टीस…प्रॅक्टीस.., काळा-पांढरा..चा जल्लोष स्टेडियम दणाणून सोडले. तसेच प्रॅक्टीसच्या खेळाडूंनी फुटबॉल मैदानावर फेरी मारून विजयोत्सव साजरा करत स्टेडियमवरील उपस्थित समर्थक, फुटबॉलप्रेमींना अभिवादन केले. त्यांच्या अभिवादनाला त्यांनी मोबाईलची लाईट पाडून, त्यांच्या दर्जेदार खेळाला टाळयांची दाद देत प्रतिसाद दिला.
प्रॅक्टीसकडून ओंकार मोरे, रोहित भोसले, इंद्रजीत चौगुले, कैलास पाटील, इमॅन्युअल यांनी तर पीटीएमकडून सुशांत बोरकर, प्रथमेश हेरेकर, ओमकार जाधव, ओंकार पाटील, ऋषीकेश मेथे-पाटील, ऋषभ ढेरे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. प्रॅक्टीसकडून सामन्याच्या 8 व्या मिनिटाला कैलास पाटील तर 32 व्या मिनिटाला कैलास पाटीलच्या पासवर पीटरने मैदानी गोल करून संघाला 2-0 गोलची आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात प्रॅक्टीसला ही आघाडी कायम राखण्यात यश मिळविले. उत्तरार्धात प्रॅक्टीसकडून राहूल पाटील, रोहित भोसले यांनी गोल करण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले. मात्र, सामन्याच्या 48 व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा फायदा उठवत राहूल पाटीलने मैदानी गोल करून संघाला 3-0 गोलची निर्णायक विजयाची आघाडी मिळवून दिली. पीटीएमकडून आघाडी कमी करण्यासाठी ओमकार जाधव, ओंकार पाटील, सुशांत बोरकर, ऋषीकेश मेथे, प्रथमेश हेरेकर यांनी केलेले प्रयत्न गोलकिपर प्रविण बलविरसिंगने फोल ठरविले. सामना प्रॅक्टीसने 3-0 गोलने जिंकत सलग दुसऱया वर्षी केएसए लीग चषकावर कब्जा मिळविला.
केएसए लीग वरिष्ठ गट स्पर्धेतील दोन्ही गटातील 16 संघांचे एकुण गुण
सुपर सिनिअर गट 8 संघ अनुक्रमे विजेते ः प्रॅक्टीस (17 गुण), शिवाजी (14 गुण व गोलफरक प्लस 10), फुलेवाडी (14 गुण व गोलफरक प्लस 5), बालगोपाल (13), पीटीएम ‘अ’ (09), खंडोबा ‘अ’ (06), दिलबहार ‘अ’ (05), संयुक्त बुधवार (01). सिनिअर गट 8 संघ अनुक्रमे विजेते ः बीजीएम स्पोर्टस (14), खंडोबा ‘ब’ (13), कोल्हापूर पोलीस (10 गुण व गोलफरक 0), उत्तरेश्वर (10 व गोलफरक -1), पीटीएम ‘ब’ (09 गुण व गोलफरक प्लस 3), ऋणमुक्तेश्वर (9 गुण व गोलफरक प्लस 2), मंगळवार पेठ (06 गुण), संध्यामठ (04).
तिकीट विक्रीतून जमले 16 लाखांपेक्षा अधिक रक्कम
केएसए लीग वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत एकुण सुपर सिनिअर 8 व सिनिअर 8 असे एकुण 16 संघात 56 सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेतील सामन्यांच्या तिकीट विक्रीतून सुमारे 16 लाख 13 हजार 180 रुपये जमा झाले. यातील 40 टक्के रक्कम 16 संघांना प्रत्येकी सुमारे 40 हजार 329 रुपये देण्यात आले. सामन्याच्या मध्यंतरामध्ये ही रक्कम प्रत्येक संघाला प्रदान करण्यात आली. तसेच मालोजीराजे छत्रपती यांच्यातर्फे विजेत्या संघाला 1 लाख, उपविजेत्या संघाला 75 हजार, तृतीय 50 तर चौथ्या क्रमांकाच्या संघाला 25 हजार रोख बक्षिस देण्यात आले.
सामन्याचे उद्घाटन व बक्षिस वितरण
सामन्याचे उद्घाटन खासदार संभाजीराजे छत्रपती व उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. सामना सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ पंच कै. रणजीत नलवडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पोलिस उपअधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, केएसएचे पदाधिकारी माणिक मंडलिक, प्रा.अमर सासणे, संभाजीराव मांगोरे-पाटील, राजेंद्र दळवी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी यांनी घेतले परीश्रम
गतवर्षी फुटबॉल हंगामाला गालबोट लागल्यामुळे स्पर्धांवर बंदी आली. यामुळे केएसएतर्फे यंदाच्या वर्षी नविन नियमावली करून आदर्श आचारसंहिता, नियमावली करण्यात आली होती. त्यानुसार स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात केएसए कर्मचारी स्टाफने संघ व खेळाडूंची संगणकावर नोंदणी, पदाधिकाऱयांबरोबर, पोलिस प्रशासन, व्हाईट आर्मी जवान, वैद्यकीय पथक, ऍम्ब्युलन्स, फुटबॉलप्रेमी, समर्थक, ज्येष्ठ खेळाडूंचे मोलाचे सहकार्य लाभले. अंतिम सामन्याचे मुख्य पंच म्हणून सुनिल पोवार तर सहाय्यक पंच म्हणून राजेंद्र राऊत व प्रदीप साळोखे यांनी काम पाहिले. संपूर्ण केएसए लीग वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांचे सूत्रसंचालन विजय साळोखे यांनी केले. सामना निरीक्षक म्हणून नितीन जाधव, प्रा.अमर सासणे, संभाजीराव मांगोरे-पाटील, राजेंद्र दळवी, रेफ्री असोसिएशनचे सचिव प्रदीप साळोखे आदींनी काम पाहिले.