बेंगळूर : भारताचा आघाडीवीर फलंदाज केएल राहुल गतवर्षी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आपण वापरलेल्या बॅट, ग्लोव्ह्ज आदी क्रिकेट साहित्य लिलावासाठी सुपूर्द करत असून लिलावातून मिळणारी रक्कम गरीब, गरजू मुलांसाठी विनियोगात आणली जाणार आहे. राहुलने 29 व्या वर्षात पदार्पण करताना ट्वीटरवरुन व्हीडिओ मेसेज पोस्ट करत त्यातून याची माहिती दिली. सोमवारपासूनच या प्रत्यक्ष ऑनलाईन लिलावाला सुरुवात झाली. या सर्व साहित्यावर त्याची स्वाक्षरी आहे.
‘मी माझे क्रिकेट पॅड, ग्लोव्ह्ज, हेल्मेट व काही जर्सी भारत आर्मीला सुपूर्द केले आहे. भारत आर्मी या सर्व साहित्याचा लिलाव करेल आणि मिळणारी रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाईल. ही सर्व मदत अवेयर फाऊंडेशनकडे सुपूर्द केली जाणार आहे. चाहत्यांचा प्रतिसाद अपेक्षित आहे’, असे राहुल म्हणाला.