पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 272, अजिंक्य रहाणेचीही उत्तम सुरुवात
सेंच्युरियन / वृत्तसंस्था
सलामीवीर केएल राहुलने कसोटी क्रिकेटमधील सातवे तर विदेशी भूमीतील सहावे खणखणीत शतक साजरे केल्यानंतर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर 3 बाद 272 धावांची उत्तम मजल मारली. केएल राहुल 248 चेंडूत 17 चौकार, 1 षटकारासह 122 तर अजिंक्य रहाणे 81 चेंडूत 8 चौकारांसह 40 धावांवर खेळत होते. दिवसातील तिन्ही बळी अनुभवी, जलद गोलंदाज एन्गिडीने घेतले. त्याने 17 षटकात 45 धावांच्या बदल्यात हे यश प्राप्त केले.
शतकवीर केएल राहुलची सलामीवीर मयांक अगरवालसमवेतची शतकी भागीदारी हे भारताच्या डावाचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले. या जोडीने 117 धावांची सलामी दिली. प्रारंभी सावध सुरुवात करणाऱया कर्णधार विराट कोहलीची (94 चेंडूत 35) एकाग्रता एन्गिडीने भंग केली. दडपणाखालील चेतेश्वर पुजारा आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद होणे निराशाजनक ठरले.

पुजाराप्रमाणेच संघातील स्थान धोक्यात असलेला अजिंक्य रहाणे सावध पावित्र्यावर भर देत खराब चेंडूवर फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरला. लुंगी एन्गिडीचा अपवाद वगळता अन्य दक्षिण आफ्रिकन गोलंदाज मात्र कमालीचे अपयशी ठरले. त्यांची स्वैर गोलंदाजी भारताच्या पथ्यावर पडणारी ठरली.
आपले सातवे कसोटी शतक झळकावणाऱया राहुलने चौफेर फटकेबाजी साकारत दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला. याच वर्षात त्याने इंग्लंडविरुद्धही शानदार शतक झळकावले होते. रोहित शर्माच्या गैरहजेरीत राहुलवर मुख्य भिस्त होती आणि त्यानेही जबाबदारीने खेळ साकारत उत्तम फटके निवडले. कर्नाटकचा संघसहकारी अगरवालने स्ट्राईक रोटेट करत राहुलला उत्तम साथ दिली. दिवसअखेर राहुलने 16 चौकार व 1 षटकारासह 122 धावांपर्यंत मजल मारली. त्याच्या खेळीत कव्हर ड्राईव्ह व बॅकफूटवरील फटक्यांचा उत्तम मिलाफ राहिला.
त्याने केशव महाराजला षटकार खेचत नव्वदच्या घरात प्रवेश केला. नंतर पॉईंटकडे स्टीयर करत अगदी थाटात आपले शतक साजरे केले. त्याने कोहलीसमवेत 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही साकारली. एन्गिडीने अगरवाल व पुजारा यांना सलग चेंडूंवर बाद केले. तिसऱया सत्रात विराटच्या रुपाने एकच भारतीय फलंदाज बाद झाला. रहाणे व केएल राहुल यांनी त्यानंतर चौथ्या गडय़ासाठी 73 धावांची अभेद्य भागीदारी साकारत भारताला 90 षटकात 3 बाद 272 धावांची मजल मारुन दिली. कर्णधार विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर या लढतीत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
धावफलक
भारत पहिला डाव ः केएल राहुल खेळत आहे 122 (248 चेंडूत 17 चौकार, 1 षटकार), मयांक अगरवाल पायचीत गो. एन्गिडी 60 (123 चेंडूत 9 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. पीटरसन, गो. एन्गिडी 0 (1 चेंडू), विराट कोहली झे. मल्डर, गो. एन्गिडी 35 (94 चेंडूत 4 चौकार), अजिंक्य रहाणे खेळत आहे 40 (81 चेंडूत 8 चौकार). अवांतर 15. एकूण 90 षटकात 3 बाद 272.
गडी बाद होण्याचा क्रम
1-117 (मयांक, 40.2), 2-117 (पुजारा, 40.3), 3-199 (विराट, 68.2).
गोलंदाजी
कॅगिसो रबाडा 20-5-51-0, लुंगी एन्गिडी 17-4-45-3, मार्को जान्सन 17-4-61-0, वियान मुल्डर 18-3-49-0, केशव महाराज 18-2-58-0.
बॉक्स
सत्रनिहाय खेळावर दृष्टिक्षेप
सत्र / षटके / धावा / बळी / सरासरी
पहिले / 28 / 83 / 0 / 2.96
दुसरे / 29 / 74 / 2 / 2.55
तिसरे / 33 / 115 / 1 / 3.48
बॉक्स
केएल राहुलची कसोटीतील 7 पैकी 6 शतके विदेशात!
युवा सलामीवीर केएल राहुलने कसोटी कारकिर्दीत आजवर 7 शतके झळकावली असून आश्चर्य म्हणजे यातील 6 शतके विदेशी भूमीत फटकावलेली आहेत.
केएल राहुलची कसोटी शतके
तारीख / धावा / प्रतिस्पर्धी / ठिकाण / निकाल
6 जानेवारी 2015 / 110 / ऑस्ट्रेलिया / सिडनी / अनिर्णीत
20 ऑगस्ट 2015 / 108 / श्रीलंका / कोलंबो / भारत विजयी
30 जुलै 2016 / 158 / वेस्ट इंडीज / जमैका / अनिर्णीत
16 डिसेंबर 2016 / 199 / इंग्लंड / चेन्नई / भारत विजयी
7 सप्टेंबर 2018 / 149 / इंग्लंड / ओव्हल / भारत पराभूत
12 ऑगस्ट 2021 / 127* / इंग्लंड / लॉर्ड्स / भारत विजयी
26 डिसेंबर 2021 / 122* / द. आफ्रिका / सेंच्युरियन / –









