उच्च शिक्षित डॉक्टरांनी शहराबरोबर ग्रामीण भागात देखील सेवा देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता
प्रतिनिधी / बेळगाव
सतत सकारात्मक राहून कार्यरत राहिले पाहिजे. आपली सकारात्मक वृत्तीच आपल्याला यशस्वी मार्ग दाखविते. अयशस्वी होणे हा जीवनाचा शेवट नसून एखादी गेष्ट प्राप्त होण्यासाठी त्याचा पाठलाग करत राहणे म्हणजे यशस्वी होणे होय. असे मत तेलंगणा हैद्राबाद येथील एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रोरोलॉजी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केले.
केएलई ऍकडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍन्ड रिसर्च केएलई काहेर विद्यापीठाचा 11 वा पदवीदान समारंभ गुरूवारी जिरगे सभागृहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर काहेरचे कुलगुरू व केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, प्रा. डॉ. विवेक ए. सावजी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यापीठातील प्राध्यापक वर्गांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. विवेक सावजी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
रेड्डी पुढे म्हणाले, उच्च शिक्षित मनुष्यबळ सुखासीन आयुष्याच्या शोधामध्ये परदेशात जात आहे. मात्र तसे न करता उच्च शिक्षित डॉक्टरांनी शहराबरोबर ग्रामीण भागात देखील सेवा देण्यास पुढे आले पाहिजे. देशात पेन-किलर्स सेवन करणाऱयांची संख्या वाढली आहे. पेन-किलर हे औषध नाही. थोडय़ा काळापुरती ते बरे करते. मात्र पेन-किलरचा अतिरेक टाळावा असे आवाहन देखील त्यांनी केले. देशात 2019 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. या महामारीत अनेकांना जीव गमवावा लागला. यावेळी चित्रफितीद्वारे एका आजारी कुंटुंबियांची झालेली अवस्था दाखवून मार्गदर्शन केले. तसेच काही पेटिंग केलेली चित्रे दाखवून भावी डॉक्टरांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला. यावेळी डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी केएलई काहेर विद्यापीठाच्या शिस्त व इतर बाबींबाबत कौतुक केले.
विद्यार्थ्यांचा पदवी वितरण सोहळा
यावेळी विद्यापीठातील नर्सिंग, बीएएमएस, बी. फॉर्म, एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवी वितरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.या पदवीदान समारंभात 1521 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. 35 जणांनी सुवर्णपदक पटकाविले. 18 जणांना पीएचडी, 7 जणांना पोस्ट डॉक्टरल, 462 जणांना पदविका, 942 जणांना पदवी, 75 जणांना पीजी डिप्लोमा, 10 जणांना सर्टिफिकीट कोर्स, 10 फेलोशीप आणि 6 डिप्लोमा पदवी देण्यात आली.
जेएनएमसीची विद्यार्थिनी डॉ. मोहिनी अगरवाल यांनी एमबीबीएस परीक्षेत तीन सुवर्णपदके पटकाविली. कंकणवाडी आयुर्वेंद कॉलेजची विद्यार्थिनी अक्षता लडगी हिने बीएएमएस परीक्षेत तीन सुवर्णपदके मिळविली तर ऋतुजा बाळोळी या केएलई फिजीओ थेएरपीच्या विद्यार्थिनीने दोन सुवर्णपदके पटकाविली.