कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्डसाठी मागणी, दोन महिन्यांमध्ये प्रथमच लाखाहून कमी रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
18 वर्षांवरील सर्वांना विनामूल्य लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्वरित केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन या भारतनिर्मित आणि कोव्हीशिल्ड या भारत उत्पादित लसींसाठी मागणी नोंदविली आहे. सरकार या लसींच्या अनुक्रमे 19 कोटी आणि 25 कोटी लसींच्या मात्रा (डोस) खरेदी करणार आहे. याशिवाय ‘बॉयोलॉजिकल ई’ या लसीच्या 30 कोटी मात्रांसाठीही मागणी नोंदविण्यात आली आहे. ही लस सप्टेंबरमध्ये मिळणार आहे.
येत्या डिसेंबरच्या अखेरपर्यंत देशातील 80 टक्के जनतेचे लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार केंद्र सरकारच्या हाती सर्व सूत्रे राहणार असून ते 27 टक्के लसी एकहाती खरेदी करणार आहे. नंतर त्यांचे वितरण राज्यांना विनामूल्य करण्यात येईल. लस टोचण्याचे उत्तरदायित्व राज्यांवर सोपविण्यात आले आहे. खासगी रुग्णालये आणि खासगी लसीकरण केंद्रे लसनिर्मिती कंपन्यांकडून 25 टक्के लसींची खरेदी कंपन्या ठरवितील त्या दराला खरेदी करणार आहेत. खासगी लस टोचण्याचा दर 150 रूपये ठरविण्यात आला आहे. 21 जून पासून लसीकरणाला मोठा वेग प्राप्त होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारची प्रशंसा
लस खरेदी व वितरण याची सूत्रे स्वतःच्या हाती घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची प्रशंसा अनेक तज्ञांनी केली आहे. यामुळे लसींसाठी राज्यांमध्ये अनावश्यक स्पर्धा टळणार आहे. तसेच राज्यांना योग्य तेवढी लसीची मात्रा मिळेल. लस विनामूल्य देण्याच्या निर्णयाचेही स्वागत करण्यात येत आहे.
नवे रुग्ण लाखाहून कमी
मंगळवारी सकाळी केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासांमध्ये 84 हजार 347 नवे रुग्ण देशात आढळले आहेत. याच कालावधीत एकंदर 1 लाख 82 हजार 497 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या 13 लाख 3 हजार 702 पर्यंत कमी झाली आहे. गेल्या चार आठवडय़ांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्येत 65 टक्के घट झाली आहे. 10 मे या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या 37 लाख 45 हजारांहून अधिक होती. गेल्या 63 दिवसांमध्ये प्रथमच चोवीस तासांमधील नव्या रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी झाली आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण आता 4.62 टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत 23 कोटी 62 लाख लसी देण्यात आल्या आहेत. ही सर्व माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिली.
ब्लॅक फंगस स्टेरॉईडमुळे नाही ?
ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे, किंवा ज्यांनी कोरोनातून बरे होण्यासाठी मोठय़ा प्रमाणात स्टेरॉईडयुक्त औषधे घेतली आहेत, किंवा ज्यांना बराच काळ अतिदक्षता विभागात (आयसीयु) रहावे लागले आहे, त्यांना कोरोनातून बरे झाल्यानंतर ब्लॅक फंगस (काळी बुरशी) चा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, असे मानले जात आहे. तथापि, अशी स्थिती नसतानाही अनेकांना हा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. या संसर्गाने त्रस्त असणाऱयांपैकी 30 टक्के लोकांच्या संदर्भात वरील पैकी काहीही घडलेले नाही. तरीही, त्यांना हा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे या संसर्गाच्या कारणांवर नव्याने संशोधन करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.
असे ठरणार वितरणाचे प्रमाण
एखाद्या राज्याची लोकसंख्या, तेथील कोरोना रुग्णसंख्या आणि त्या राज्यात आतापर्यंत किती लसी वाया गेल्या याचा विचार करून केंद्र सरकार त्या राज्याला लसपुरवठा करणार आहे. पुरवठा करण्याचे हे सूत्र लवकरच अधिक सविस्तररित्या स्पष्ट करण्यात येईल. काही राज्यांमध्ये लसी वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. दिलेल्या लसी वाया घालवून ही राज्ये केंद्र सरकारने लसीच दिल्या नाहीत अशी तक्रार करताना दिसतात. या गैरप्रकाराला आणि लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
मुलांसबंधीचा अपप्रचार
कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती बालकांसाठी अधिक धोकादायक ठरेल, असे काही जणांकडून सांगितले जात आहे. तथापि, तो अपप्रचार आहे. कारण त्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. परिणामी, लोकांनी विनाकारण चिंता करू नये तसेच आपल्या मताप्रमाणे उपाययोजनाही करू नये. तज्ञांच्या सूचनेशिवाय स्वतःच्या मताप्रमाणे उपाय योजना केल्यास ती घातक ठरण्याची शक्यता असते, असा स्पष्ट इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.
लसीकरणाचा वेग वाढणार
ड पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर हालचालींना गती
ड येत्या दोन महिन्यांमध्ये लसीकरणाला वेग
ड वितरणात वाया जाण्याचे प्रमाण तपासणार ड राज्यांना पुरेशा प्रमाणात लस दिली जाणार









