ऑनलाईन टीम/ नागपूर :
कोरोना साथीच्या काळात देशात वेगळी आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने नव्याने अर्थसंकल्प सादर करून देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली .
चव्हाण यांनी माध्यमांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. चव्हाण म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यावर उपाय म्हणून जवळपास सर्वच देशांनी नागरिकांना रोख रक्कम दिली. आताच्या परिस्थितीत नुसते उत्पादन वाढवून चालणार नाही. लोकांची क्रयशक्तीच नसेल तर त्याचा काहीएक फायदा होणार नाही. याचा सारासार विचार करून अमेरिका, ब्रिटन, जपान सर्वच देशांनी पॅकेज देताना नागरिकांच्या हातात जास्तीत जास्त रक्कम कशी जाईल, याची तजवीज केली आहे. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मीही हीच मागणी करीत आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येचा विचार करता आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. अशा नाजूक आर्थिक स्थितीत छोटीशी चूकही आपल्याला महागात पडू शकतो.
कोरोनापूर्वीच भारताचा विकासदर ३.१ टक्के खाली आला होता. कोरोनामुळे केंद्राला त्यांच्या अपयशावर पांघरून घालण्याचा बहाणा मिळाला. अशा परिस्थिती आपण आत्मनिर्भर कसे होणार, असा सवालही चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.









