प्रतिनिधी / जयसिंगपूर
केंद्र सरकार शेतकर्यांना अदानी व अंबानीचे गुलाम बनविण्यासाठी कृषि कायदे मंजूर केले आहेत. शेतकर्यांच्या जमिनी त्यांच्या घशात घातल्या जाणार आहेत. अजून तुमची भूक किती ? याचा जाब विचारण्यासाठी दि. 22 डिसेंबर रोजी मुंबई बीकेसी येथील अंबानी व अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. या मोर्चामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू, व्ही. एम. सिंग, आमदार कपिल पाटील, बाबा आढाव, मेधाताई पाटकर, प्रतिभाताई शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की
गेली 23 दिवस थंडी, वार्याची तमा न बाळगता शेतकरी लाखोंच्या संख्येने बसले आहेत. तरी सुध्दा सरकारला दया यायला तयार नाही, हे केवळ देशातल्या मोजक्या आणि मूठभर उद्योगपतींच्या साठी चालले आहे. तीन कायदे केलेले किती फायद्याचे आहेत, हे केंद्र सरकारचे मंत्री माध्यमातून सांगत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. शेतकर्यांना हे कायदे अजिबात मान्य नाही. छोट्या व सिमांत शेतकर्यांना गुलाम बनविण्याचे कारस्थान सुरू आहे. हे कायदे कुणासाठी करत आहेत. कायदे मागे घेऊन नव्याने पुन्हा आणा. कारण यामध्ये हमीभावाची तरतूद नाही. सरकारच अन्नधान्य खरेदी केल्यास शेतकर्यांना हमीभाव मिळणार आहे. मग उद्योगपतींनी धान्य खरेदी केल्यास त्या हमीभावाची जबाबदारी सरकार कशी घेणार ?
अंबानी अदानी खरेदी करू आम्हाला काही फरक पडत नाही. पण त्यांनी हमी भावानेच खरेदी करणे आवश्यक आहे. व तो कायदा संसदेमध्ये पास करा, हीच आमची मागणी आहे. कारण देशातील गोडाऊन अंबानी व अदानींच्या ताब्यात जातील. त्यांचे बांधकाम देखील सुरू आहे. कायदे व्हायच्या अगोदरच ह्यांची तयारी होती. सुगी चालू झाल्यावर दर पाडून खरेदी करायचे व सुगी संपल्यावर ग्राहकांना चढ्या दरात विकायचे, हा त्यांचा धंदा असणार आहे. अन्नधान्याचा साठा उद्योगपतींच्या ताब्यात ठेवायचा, हे कारस्थान सुरू आहे.
सर्वमामान्य शेतकर्यांना गुलाम बनविण्यासाठी हे कायदे बनवणार असाल तर, आम्ही 22 डिसेंबर रोजी बीकेसीमधील अंबानीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. तिथे जाऊन त्यांना जबा विचारणार आहोत. शेतकर्यांच्या जमिनी तुम्हाला हव्या आहेत काय? शेतकर्यांना गुलाम करणार आहे काय? हे विचारण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. राज्यातील सर्व शेतकर्यांनी या मोर्चामध्ये सामील, व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.