डिसेंबरपासून राज्य सरकारकडून रेशन वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्याने लॉकडाऊन काळापासून अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला होता. त्याची मुदत आता 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना डिसेंबरपासून केवळ राज्य सरकारकडून मिळणारे रेशन उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणारा 5 किलो मोफत तांदूळ बंद होणार आहे.
गतवषी कोरोनाकाळात गोरगरीब कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 किलो तर केंद्र सरकारकडून अतिरिक्त 5 किलो तांदूळ दिले जात होते. दरम्यान जूनपासून शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक माणसाला 10 किलो तांदळाचा पुरवठा केला जात होता. ही घोषणा नोव्हेंबर महिन्यापर्यंतच केली होती. त्यामुळे पुढील महिन्यापासून केंद्र सरकारचा 5 किले तांदळाचा पुरवठा बंद होणार आहे. लाभार्थ्यांना आता केवळ राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 किलो तांदूळ वितरित केले जाणार आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 2020 पर्यंत हा रेशन पुरवठा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने नोव्हेंबर 2021 पर्यंत ही मुदत वाढविण्यात आली होती. त्यामुळे लाभार्थ्यांना माणसी 10 किलो तांदूळ मिळत होते. मात्र केंद्र सरकारकडून होणारा रेशनचा पुरवठा डिसेंबरपासून बंद केला जाणार आहे. कोरोनाकाळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे शासनाकडून अतिरिक्त रेशन पुरवठा करून अनेकांना धीर देण्यात आला होता.









