संभाव्य तिसऱया लाटेच्या व्यवस्थापनासाठी मदत
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून राज्याला 1500 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बेंगळूरच्या जयनगर येथे बांधण्यात आलेल्या युनायटेड रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चालना देऊन ते बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, गुलबर्गा येथे उत्कृष्ट सेवा बजावून बेंगळूरमध्येही रुग्णालय सुरू करणे आनंदाची बाब आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आरोग्य सुविधांची कमतरता होती. दरम्यान, खासगी रुग्णालयांनी दिलेले सहकार्य कौतुकास्पद होते. गुलबर्गा जिल्हा केंद्रातील युनायटेड हॉस्पिटलने हजारो कोरोनाबाधितांवर योग्यरित्या उपचार केले आहे.
राज्यातील आरोग्य क्षेत्राला आणखीन बळकट देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याला यश मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांचे सहकार्य आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने अलीकडच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या व्यवस्थापनासाठी 23 हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. त्यामधील 1,500 कोटी रुपये राज्याला मदत म्हणून मिळाली असून राज्यातील मुलांच्या विभागाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संभाव्य तिसऱया लाटेसाठी आवश्यक असणारी खबरदारी आतापासूनच घेतली जात आहे, असेही मंत्री सुधाकर म्हणाले. दरम्यान, खासदार तेजस्वी सूर्या, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुगळखोड-जिडगा मठाचे पीठाधीश परमपुज्य षडक्षरी शिवयोगी, मुरुघराजेंद्र महास्वामीजी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, युनायटेड रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम सिद्धारेड्डी, माजी केंद्रीय मंत्री राणी सतीश, माजी मंत्री पीजीआर सिंदिया, आमदार पी. राजीव, रुग्णालयाचे कार्यनिर्वाहक सचिव डॉ. शांतकुमार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.









