अनलॉक-5 आजपासून : 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहांना परवानगी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच देशात गुरुवार 1 ऑक्टोबरपासून अनलॉक-5 ची प्रक्रिया सुरू होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दिशानिर्देशांनुसार 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच शाळांबाबतचे निर्णय 15 ऑक्टोबरदरम्यानच घेण्याची सूचना केली आहे. मात्र, कंटेनमेंट क्षेत्रांमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात येत असल्याचेही नव्या नियमावलीत स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या भागात विशेषतः सिनेमागृहांना 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीसह अनुमती देण्यात आली. तसेच कंटेनमेंट झोनबाहेरील मनोरंजन पार्क आणि छोटय़ा यात्रा-कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. राज्य सरकारे 15 ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने शाळा आणि कोचिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. गृह मंत्रालयाने मंजूर केलेल्या व्यावसायिक उड्डाणांव्यतिरिक्त अन्य आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानांवरील बंदीही कायम ठेवण्यात आली आहे.
विविध ठिकाणी सूट शाळा आणि कोचिंग सेंटर सुरू करण्याबाबत राज्य सरकार 15 ऑक्टोबरनंतर निर्णय घेऊ शकतात. शाळा सुरू करण्यासाठी पालकांची संमती देखील आवश्यक असून राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग यामध्ये लक्ष घालेल, असे नव्या दिशानिर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात राष्ट्रव्यापी अनलॉकचा चौथा टप्पा 30 सप्टेंबरला संपला. 1 सप्टेंबरला सुरू झालेल्या अनलॉक-4 मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासोबतच इतर विविध ठिकाणी सूट दिली होती.