सोनिया गांधींचा आरोप : इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी आंदोलन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसच्यावतीने देशव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून आंदोलनादरम्यान करण्यात आला. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारवर टीका करत जनतेची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप केला.
गेल्या 23 दिवसांपैकी 22 दिवस इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल दरात तब्बल दहा-दहा रुपये वाढ झाली असून सरकारकडून जनतेची अक्षरशः पिळवणूक सुरू असल्याचा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला. तसेच माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपवर घणाघाती टीका केली. इंधन दरवाढीच्या माध्यमातून नफेखोरी सुरू असून सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. कोरोना संसर्गामुळे आधीच जनता आर्थिकदृष्टय़ा होरपळलेली असताना सध्या होत असलेली दरवाढ घातक असल्याचे ते म्हणाले. प्रियांका गांधी यांनीही व्हिडीओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावर प्रसारित केली.
देशभर आंदोलन
इंधन दरवाढप्रश्नी देशात सर्वत्रच सोमवारी विविध पातळीवर आंदोलन करण्यात आले. महत्त्वाची शहरे आणि जिल्हा पातळीवर हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या चौकटीत आंदोलन करण्याची सूचना पोलीस व प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, कित्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.









