विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी, पक्षबांधणी, पक्षशिस्तीवर भर
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेसने 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून पक्षबांधणी आणि पक्षशिस्त यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबत दोन परीपत्रकेही पक्षाने प्रसिद्ध केली आहेत. प्रत्येक निर्णय सर्वाना विश्वासात घेऊन घेतला जाणार आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांच्या समोर जाण्याअगोदर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या निदर्शनास विषय आणला जावा, असेही परिपत्रकात सूचित केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्याची तयारीही काँग्रेसने केली आहे.
पक्षबांधणी आणि मतदारसंघातील सक्रिय काम यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी मतदारसंघ प्रमुखांनी आठवडय़ातील किमान दोन दिवस मतदारसंघात काम करावे, असेही सूचित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीला अवघ्या दीड वर्षाचा कालावधी बाकी असल्याने काँग्रेस सक्रिय झाली आहे. बुथ बांधणी आणि प्रशिक्षण यावर सध्या काँग्रेसने भर दिला आहे. दक्षिण गोव्यात डॉ. प्रमोद साळगावकर व उत्तर गोव्यात सुदिन नाईक यांनी प्रशिक्षण उपक्रम यशस्वी केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. के. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम करण्यात येत आहे.
मतदारसंघ गटसमित्या फेररचना व बांधणी
निवडणुकीच्या दृष्टीने उपक्रम हाती घेतलेल्या काँग्रेस पक्षाने केपे, काणकोण, वेळ्ळी, नुवे, कुंकळी, पर्ये, मये या मतदारसंघांतील गटसमितींची फेररचना केली आहे तर दाबोळी, पेडणे, सांतआंद्रे, मडकई या मतदारसंघांतील गटसमित्या बरखास्त केल्या आहेत. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात गटसमित्या मजबूत करून पक्षाची बांधणी करण्यावर सध्या भर दिला जात आहे. मतदारसंघात काम करणाऱया कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम पक्षाने हाती घेतले आहेत.
प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते सक्रिय
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह अन्य आमदारही सध्या पक्षकार्यात सक्रिय झाले आहेत. एक वेगळी रणनीती आखून यावेळी निवडणुकीला जाण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी मतदारसंघात सक्रियपणे काम करणाऱया कार्यकर्त्यांची फळी तयार केली जाणार आहे. युवा कार्यकर्त्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचबरोबर पक्षाच्या विविध समित्या सक्रिय करून सरकारला उघडे पाडण्याचे आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश उघड करणार
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकार कोविड 19 च्या बाबातीत आणि एकूणच देश आणि राज्य पूढे नेण्यासाठी कसे अपयशी ठरले आहे, याबाबत जनतेमध्ये उघडपणे जागृती केली जाणार आहे. कोरोना नियंत्रणाच्या अपयशामुळे देशाला आर्थिकदृष्टय़ा कसे संकटात टाकले आहे, यावर बोट ठेवले जाणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशामुळे देश कसा अडचणीत आला आहे, हेही जनतेसमोर मांडले जाणार आहे.









