प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात येऊ घातलेल्या तीन विध्वंसकारी महाप्रकल्पांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या केंद्रीय सशक्तीकरण समितीने जो अहवाल सादर केला आहे त्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाने स्वागत केले असून गोव्यातील जैवविविधतेसाठी महत्त्वाचे क्षेत्र असलेले मोलेचे जंगल वाचविण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पर्यावरण रक्षणासाठी गोव्यातील युवकांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फळ असून गोव्याचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुढे सरसावलेल्या या युवा पिढीला कुणी गृहीत धरू नये असा हा इशारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोवा वाचविण्यासाठी जी टीम गोवा ही संकल्पना पुढे आली आहे तिचे ही युवा पिढीच अग्रदूत असून गोवा वाचविण्यासाठी ती रस्त्यावर येण्याबरोबरच समाजमाध्यमांवरही सक्रिय होती. हे केल्यामुळे त्यांना सरकारी आदेशावरून पोलिसांच्या जांचालाही सामोरे जावे लागले. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. गोवा राखून ठेवण्यासाठी काहींनी आपल्या भविष्याचीही चिंता केली नाही. ही युवा पिढीच टीम गोवाचा प्रेरणास्रोत असल्याचे सरदेसाई यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मोले हा केवळ गोव्यापुरता मर्यादित विषय नव्हता, तर तो राष्ट्रीय मुद्दा होता. या युवा पिढीने त्यासंदर्भात दिलेली हांक सगळय़ा देशाला ऐकू आली, पण आमच्या मुख्यमंत्र्यांना ती ऐकू आली नाही ही दुर्दैवाची बाब आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. गोव्याच्या पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेली ही मोहीम अशीच चालू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करताना गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही टीम गोवा स्थापन करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्याचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी युवा पिढी सज्ज झाली आहे, असे मत त्यांनी त्यात व्यक्त केले आहे.
मोलेचे रक्षण करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व एनजीओना गोवा फॉरवर्डचा सतत पाठिंबा असेल. या पर्यावरण रक्षण लढय़ात आम्ही नेहमीच लोकांबरोबर राहू, असे आश्वासन सरदेसाई यांनी दिले आहे. गोव्याच्या प्रशासनावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, गोव्याच्या इतिहासात आजच्यासारखा अंधार यापूर्वी कधीच नव्हता. या मुख्यमंत्र्यांना गोव्याचे काहीच पडून गेलेले नाही हे त्यांनी घेतलेल्या मोले आणि म्हादईविषयीच्या निर्णयांनी स्पष्ट झाले आहे. कोविडच्या व्यवस्थापनात शिथीलता आणून त्यांनी आपली अकार्यक्षमता दाखवून दिली आहे, असे सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना म्हटले आहे. गोव्याच्या प्रश्नांसाठी लढणारे एनजीओ, विद्यार्थी, अन्य नागरिक यांच्याबरोबर गोवा फॉरवर्ड नेहमीच ठामपणे उभा राहील, असे आश्वासन देताना गोवेकरांना प्रादेशिक पक्षच न्याय देऊ शकतील, असे त्यांनी म्हटले आहे.









