मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्रं मोदी यांना पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेले प्रयत्नही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात सविस्तर मांडले आहे. सरकारने आणलेला अध्यादेश, नेमलेला आयोग, विधीमंडळात केलेला कायदा, सुप्रीम कोर्टात सरकारने दोन वेळा याबाबत केलेले प्रयत्न याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्रातून दिली आहे.
राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला. राज्याला अशा पद्धतीने आरक्षण देण्याचा अधिकार नाही असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून राज्याला मराठा आरक्षण द्यावे आणि त्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत. यानुसार मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी कारवाई करावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी पाच वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत सांगितलं होते.
Previous Articleकर्नाटक: इंदिरा कॅन्टीनमार्फत २४ मे पर्यंत मोफत भोजन
Next Article दिल्लीत दिवसभरात 12,481 नवे कोरोना रुग्ण








