केंद्रीय मंत्र्याने सांगितली मोदी सरकारची योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरला (पीओजेके) पुन्हा प्राप्त करणे पुढील अजेंडा असल्याचे रविवारी सांगितले आहे. येथे पीओजेकेच्या विस्थापितांना समर्पित ‘मीरपूर बलिदान दिवस’ कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले आहे. घटनेतील कलम 370 च्या बहुतांश तरतुदी रद्द करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती असलेले नेतृत्वच पाकिस्तानच्या अवैध कब्जातील काश्मीर पुन्हा प्राप्त करण्याची क्षमता बाळगून असल्याचे ते म्हणाले.
भारतीय उपखंडाचे विभाजन मानवी इतिहासातील सर्वात मोठे संकट होते. जम्मू-काश्मीरला तत्कालीन संस्थानाच्या एका हिस्स्याला गमाविण्याच्या स्वरुपात दुसऱया संकटाला तोंड द्यावे लागले, हा हिस्सा पाकिस्तानच्या अवैध कब्जामध्ये गेला. पाकिस्तानच्या ताब्यातील हा भूभाग पुन्हा प्राप्त करणे हा पुढील अजेंडा असल्याचे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
कलम 370 कधीच हद्दपार होणार नसल्याचे मानले जात होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे शक्य झाले आणि याचप्रकारे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा प्राप्त करण्याचा संकल्पही पूर्ण होईल. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा प्राप्त करणे हा केवळ एक राजकीय आणि राष्ट्रीय अजेंडा नव्हे तर मानवाधिकारांच्या सन्मानाची जबाबदारी देखील आहे, कारण पाकव्याप्त काश्मीरमध्ये आमचे बांधव अत्यंत क्रूर स्थितीत राहत आहेत. आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.
तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यावेळी 560 हून अधिक संस्थानांच्या विलयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. पण त्यांना जम्मू-काश्मीर प्रकरणापासून वेगळे ठेवण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे जम्मू-काश्मीर प्रकरण स्वतः हाताळू पाहत होते, असे त्यांनी म्हटले होते.









