ऑनलाईन टीम / लखनऊ :
देशात कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अनेक राज्यात बेडची कमतरता भासत आहे. सर्वसामान्यांबरोबरच राजकीय नेत्यांनाही बेड मिळविण्यासाठी आता वाट पहावी लागत आहे. त्याचेच एक उदाहरण गाझीयाबादमध्ये दिसून आले. केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी आपल्या कोरोनाबाधित भावाला बेड मिळाला नाही, त्यामुळे बेड उपलब्ध करून देण्यासाठी एक ट्विट केले आहे.

सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कृपया आमची मदत करा, माझ्या भावाला कोरोना संसर्ग झालेला असून, त्याला उपचारासाठी बेडची आवश्यकता आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नाही.’ सिंग यांनी हे ट्विट गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माहिती सल्लागार शलभ त्रिपाठी आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज सिंह यांना टॅग केले आहे.









