ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. स्वतः स्मृती इराणी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, माझे कोरोनाचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मी कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सदिच्छा व्यक्त करणाऱ्या शुभचिंतकांचे त्यांनी यावेळी आभार देखील मानले आहेत.
दरम्यान, स्मृती इराणी यांना गेल्या महिन्याच्या 28 तारखेला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर नवी दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराअंती आज अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये व्यस्त होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीत स्मृती इराणी भाजप पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. त्या प्रचारसभांमध्ये सहभागी झाल्या. याचदरम्यान त्या अनेकांच्या संपर्कात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे म्हटले जात होते.
स्मृती इराणी यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, नितीन गडकरी, कृष्णपाल गुर्जर, श्रीपद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गर्जेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.









