नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवारी) निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं. अशी उज्ज्वल राजकीय कारकिर्द असलेले रामविलास पासवान हे कदाचित देशातील एकमेव नेते असतील.
राजकारणाची नस पकडलेले रामविलास पासवान पहिल्यांदा १९६९मध्ये आरक्षित मतदारसंघातून संयुक्त सोशलिस्ट पार्टीकडून बिहारच्या विधानसभेत पोहोचले होते. १९७४मध्ये राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचे खंदे अनुयायी म्हणून ते लोकदलाचे सरचिटणीस बनले. राज नारायण, कर्पूरी ठाकूर आणि सत्येंद्र नारायण सिन्हा सारख्या आणीबाणीतील प्रमुख नेत्यांचे ते जवळचे सहकारी होते.









