बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा आणि खाणी मंत्री प्रल्हाद जोशी यांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मंत्री जोशी यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.मंत्री जोशी घरी इतरांपासून अलग राहत आहेत.
मंत्री जोशी यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातील अलग राहून उपचार घेत असल्याचे त्यांनी ट्विट केले.
संसदीय कामकाज मंत्री म्हणून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या संचालनासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मंत्री जोशी हे धारवाड लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत.
राज्यात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि ते त्यातून बरे झाले आहेत. कोरोना झालेल्या राजकीय नेत्यांमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि अनेक आमदारांचा समावेश आहे.