ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोरोनाचे रिपोर्ट शुक्रवारी निगेटिव्ह आले आहेत. कोरोनावर मात केल्यावर मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः अमित शहा यांनी ट्विट करून दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आज माझ्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. या दरम्यान ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाप्रती मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. स्वतः अमित शहा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर साधारण दहा ते बारा दिवस त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.