नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘शेतकऱयांनी कृषी कायद्यांना केलेल्या विरोधामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे. पण आम्ही पुन्हा पुढे जाऊ’ असे वक्तव्य करणाऱया केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
मागे घेण्यात आलेल्या कृषी कायद्यांबाबत केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी धक्कादायक विधान केले होते. नागपुरात एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी सरकारने आणलेले कृषी कायदे हा स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर केलेली सर्वात मोठी सुधारणा असल्याचे त्यांनी म्हटले होते. काही लोकांनी विरोध केल्यानंतर हे कायदे मागे घ्यावे लागले. विरोधामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे. पण आम्ही पुन्हा पुढे जाऊ, असे तोमर यांनी म्हटले होते. तसेच कोरोनाच्या क्षेत्राचा सर्व क्षेत्राला फटका बसला, मात्र, कृषी अर्थव्यवस्था या प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत स्थितीत राहिल्याचे तोमर म्हणाले होते. मात्र, ‘एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे’ या त्यांच्या विधानानंतर त्यांच्यावर विरोधकांनी आगपाखड केली होती.
काँग्रेसकडून तोमर यांच्यावर टीकास्त्र
तोमर यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारने जर आता शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तर पुन्हा देशातील अन्नदाता आंदोलन करेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. तसेच तोमर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या मागितलेल्या माफीचा अपमान केला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर, मोदी सरकार पुन्हा एकदा तीन काळे शेतकरी विरोधी कायदे नव्या स्वरूपात आणण्याचा कट रचत असून भांडवलदारांच्या दबावाखाली ते करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली होती.








