क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय कर रिक्रिएशन क्लब बेळगाव आयोजित राजू काकती स्मृती चषक आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत बेळगाव हिरोज, कलबुर्गी, बेळगाव, हुबळी व रायण्णा संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्यफेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिन्सिपल कमिशनर मिलिंद गवई यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी चेतन डिगल, सुशील जोशी, एम. एम. बिद्री, बाळाप्पा हिरेमठ, एस. एफ. हलकुर्की, पी. टी. बिद्री आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत बेळगाव, होस्पेट, बळ्ळारी, कलबुर्गी, हुबळी या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीची असून उद्घाटन सामन्यात कलबुर्गी संघाने बेळगाव हिरोज संघाचा 4 गडी राखून पराभव केला. दुसऱया सामन्यात विजयनगर वॉरियर्स संघाने हुबळी डेअरडेविल्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला. तिसऱया सामन्यात रायण्णा वॉरियर्स संघाचा बेळगाव हिरोजने 49 धावांनी पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या सामन्यात कलबुर्गी रॉयल्स संघाने हुबळी डेअरडेविल्स संघाचा 8 गडी राखून पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
या स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे यांनी तर सुनील देसाई, महांतेश गवी, चंद्रशेखर पुरद यांनी पंचांची भूमिका बजावली. तर स्कोअरर म्हणून सागर शिणगी यांनी काम पाहिले. रविवारी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहेत.









